जीएसटी कपातीमुळे बाजारात चैतन्य
व्यापाऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत
मुंबई, ता. ४ : सरकारने तब्बल ९० वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर व्यापारी व ग्राहक दोघांमध्येही आनंदाची लाट पसरली आहे. दिवाळीसाठी ग्राहकांची अधिक गर्दी होणार असून, बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण होत असल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनसह विविध व्यापारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
कपडे, पादत्राणे, टीव्ही, कार अशा वस्तूंवरील जीएसटी कमी झाल्याने ग्राहकांचा खर्च कमी होणार आहे. २,५०० पेक्षा कमी किमतीच्या कपड्यांवर केवळ पाच टक्के जीएसटी राहणार आहे, तर दैनंदिन वापरातील अनेक खाद्यपदार्थ, व्यायाम पुस्तके आणि स्टेशनरी यांनाही जीएसटीमधून सूट मिळाली आहे; परंतु अडीच हजारांपेक्षा जास्त किमतीच्या वधू-वस्त्रांवर १८ टक्के जीएसटी लागू राहणार असल्याने या विभागातील उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांमध्ये थोडीशी नाराजी आहे.
----
जीएसटी कपातीमुळे बाजारपेठांत उत्साह आहे. व्यवसायात वाढीची अपेक्षा असून ग्राहकांनाही थेट फायदा होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी व्यापाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने बंपर ठरणार आहे.
- विरेन शाह, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन