देसाई वाचनालयात उद्यापासून व्याख्यान
esakal September 05, 2025 09:45 PM

देसाई वाचनालयात
उद्यापासून व्याख्यान
कुडाळः राव बहाददूर अनंत शिवाजी देसाई (टोपीवाले) वाचनालय व ग्रंथसंग्रहालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ तसेच आयुर्वेद सेवा प्रतिष्ठान कुडाळ आयोजित ‘चातुर्मासातील व्रतवैकल्ये आणि आरोग्य यांचा संबंध’ या विषयावरील व्याख्यान आणि चर्चा ७, ८, आणि ९ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० ते ७ वाजेपर्यंत राव बहाददूर अनंत शिवाजी देसाई (टोपीवाले) वाचनालय व ग्रंथसंग्रहालय, येथे करण्यात आले आहे. व्याख्याते वैद्य सुविनय दामले आणि त्यांचे सहकारी असणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांकडून करण्यात आले आहे.
-------------
चौके ग्रामपंचायतीतर्फे
स्मार्ट मीटरला विरोध
मालवण : चौके येथील ग्रामपंचायतीने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहून त्यांच्या परिसरात पोस्टपेड किंवा प्रीपेड स्मार्ट मीटर बसवू नये, अशी मागणी केली आहे. या निर्णयाची घोषणा ग्रामपंचायतीने एका ठरावाद्वारे केली आहे. ग्रामपंचायतीने पत्रात नमूद केले आहे की, महावितरण कंपनीने राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर मोफत देण्याची जाहिरात केली होती. परंतु, आता कंपनीने जाहिरात मागे घेतली आहे आणि उर्वरित खर्च ग्राहकांनी करायचा आहे असे जाहीर केले आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार हे मीटर महावितरण कंपनीच्या खर्चातून बसवले जातील, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आता जर हे मीटर ग्राहकांच्या खर्चाने बसवले जाणार असतील तर त्याला विरोध असेल. या पार्श्वभूमीवर, चौके गावामध्ये पोस्टपेड, प्रीपेड स्मार्ट मीटर बसवू नये, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती चौके ग्रामपंचायतीचे सरपंच पी. के. चौकेकर यांनी दिली आहे.
----------------
ढवळपुरी येथे
उद्यापासून सोहळा
कुडाळः सद्गुरू संत रामपाल महाराज यांच्या अवतरण दिनानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन ढवळपुरी (जि. अहिल्यानगर) येथील आश्रमात करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार (ता.६) पासून सोमवार (ता.८) पर्यंत तीन दिवस साजरा होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात हुंडामुक्त विवाह सोहळे, अमर ग्रंथ साहेबांचा अखंड पाठ, रक्तदान शिबिर, भव्य भंडारा यांसारखे धार्मिक व सामाजिक उपक्रम होणार असल्याची माहिती दास दिलीप माने यांनी दिली. संत रामपाल महाराज आपल्या सत्संगातून ‘व्यसनमुक्त समाज’ घडवण्यावर भर देतात. समाजातील हुंडा देणे-घेणे या प्रथेला पूर्णविराम देण्यासाठी या सोहळ्यात हुंडामुक्त विवाह सोहळ्यांचे आयोजन केले आहे. यात अनेक तरुण-तरुणींचे बिना खर्चीक लग्नविधी होणार आहेत. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्गातूनही शेकडो अनुयायी रवाना होणार असून, आधीपासूनच विविध सेवांसाठी अनेक भाविक आश्रमात दाखल झाले आहेत. या काळात भाविकांसाठी तीन दिवस अखंड भंडारा सुरू असणार आहे.
-----------------

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.