भुईंज : प्रचंड उंची, हवेतील कमी होणारा ऑक्सिजनचा साठा आणि उणे १८ अंश सेल्सिअस तापमान व अन्य नैसर्गिक आव्हानांचा सामना करत गिर्यारोहणात केवळ शिखराची उंचीच नव्हे, तर जिद्दीची उंचीही अभिजित भोईटे याने सिद्ध करीत नुकतेच किलीमांजारो शिखर सर केले.
वाई येथे जन्मलेल्या अभिजित उल्हास भोईटे यास लहानपणापासूनच गड व किल्ल्यांचे आकर्षण होते. राज्यातील कळसुबाईसह अन्य शिखरेही त्याने सर केली आहेत. नोकरीनिमित्त सध्या तो दुबईत स्थायिक झाला आहे. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये लहानाचा मोठा झालेल्या अभिजितने किलीमांजारोसारख्या आंतरराष्ट्रीय शिखरावर चढाई करण्याचे स्वप्न बालपणीच उराशी बाळगले होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले.
या मोहिमेबद्दल अभिजित म्हणाला, ‘‘पाच हजार ८९५ उंचीवर असलेले हे शिखर सर करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागला. या ट्रेकने मला विस्मयकारक निसर्ग दाखवला. दररोज सरासरी आठ किलोमीटरची चढाई होती. चौथ्या दिवशी मी आजारी पडलो. अगदी लहानसा आवाजही मला त्रासदायक वाटू लागला. अन्य आव्हानांनाही सामोरे जात मी ध्येय गाठल्याचा आनंद आहे.