Namo Shetkari Mahasanman Nidhi मुंबई : महाराष्ट्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेप्रमाणं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केलेली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षात 6000 रुपये दिले जातात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणं रक्कम दिली जाते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहा हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. राज्य सरकारनं सातव्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी करण्यासाठी 1932.72 कोटी रुपये निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 7 व्या हप्त्याची रक्कम वितरीत करण्यासाठी शासन निर्णयाद्वारे 1932.72 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीची रक्कम दिली जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारनं पीएम किसानच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023-24 पासून सुरु केली आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते या योजनेची शिर्डी येथील कार्यक्रमातून सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेचा सहावा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्रातील 93.26 लाख शेतकऱ्यांना 2169 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं होतं.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम 2 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. पीएम किसानचा 20 वा हप्ता जारी झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधीच्या रकमेच्या वितरणाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी केला आहे. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मानच्या सातव्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 ला सुरु केली आहे. तेव्हापासून देशभरातील शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 प्रमाणं 6000 रुपये दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसी येथील कार्यक्रमातून 20 व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 20 हप्त्यांचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहा हप्त्यांची रक्कम मिळाली आहे.
आणखी वाचा