सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर मराठा आदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं असलं तरी सध्या ओबीसी नेते,आंदोलक आक्रमक आहेत. छगन भुजबळ यांनीही मराठा आरक्षणावरून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. आरक्षणाबाबत सरकारकडून दिशाभूल होत असल्याचे म्हणत छगन भुजब यांनी त्यांच्याच सरकारवर आरोप केला. मराठ्यांची ही ओबीसी आरक्षणात थेट घुसखोरी असल्याची टीकाही त्यांनी केली. मात्र भुजबळांच्या या विधानाचा समाचार घेत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना थेट सुनावलं. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडलं.
ओबीसी भाजपचा डीएनए, धक्का लागायला नको असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. माणसं वाढवली की धक्का लागणारच असं म्हणत त्यांनी आरक्षणावरून मराठा समाजाकडे बोट दाखवलं. मात्र आम्ही पूर्वीचेच आहोत, येवला वाल्याचा बोलण्याचा रोख वेगळा असं प्रत्युत्तर जरांगे यांनी दिलं.
येवलावाल्याचा रोख वेगळा
याला घुसखोरी म्हणता येणार नाही, याला अधिकृतपणा म्हणता येईल. पूर्वी सुसूत्रता नव्हती आता ती आणली. ज्या मराठ्यांवर ओबीसीत असूनही अन्याय झाला, त्याला आता सरकारने ओबीसीत घालायचं काम सुरूवात केली, विखे पाटील फडणवीस यांनी मराठा समाज अधिकृतपणे घालायला सुरूवात केली. त्यामुळे आता येवल्यावाल्याचा (भुजळ) बोलण्याचा रोख वेगळा आहे. मराठे आरक्षण घेणारचं हे आता त्यांना पक्क माहीत आहे, दोन महिन्यांपूर्वीही मी तेच बोललो होतो, तेव्हाही भुजबळांना याची कल्पना होती. मला आता मंत्रीपद देऊन बळीचा बकरा केलंय असं त्यांना तेव्हा वाटतं होतं, ही गुप्त माहिती मीच तेव्हा मीडियासमोर दिली होती. मराठे सरसकटच आरक्षणात गेले हे भुजबळांना आता समजलं आहे, असं जरांगे म्हणाले.
नव्या जीआरमुळे ओबीसीत वाटेकरी वाढतात असंही भुजबळांच म्हणणं होतं. त्यावरही जरांगे यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. ते आमच्यात आलेत, आम्ही त्यांच्यात चाललो नाहीयोत. आमचं, आमच्या पूर्वजाचं मन मोठं होतं. आम्ही 1881 ते आत्तापर्यंत होतो आरक्षणात, ते आत्ता आलेत, असं जरांगेनी सुनावलं. आम्ही पूर्वीचेच आहोत, पण आत्ता आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की आपल्या लेकराबाळांची प्रगती हवी असेल तर आरक्षण घ्यावे लागेल आणि आम्ही ते टप्प्याटप्प्याने घेऊ, असं त्यांनी नमूद केलं.
तरी त्याच्या अंगातील खोड जाणार नाही
ओबीसींचे नेते म्हणून भुजबळांची ओळख आहे, ती पुसली जाईल म्हणून ते वेगवेगळ्या मार्गाने आपली नाराजी, संताप व्यक्त करत आहेत का असा सवाल जरांगे यांना विचारण्यात आला. त्यांची ओळख ते पुसू देणार नाहीत. आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे, त्याप्रमाणे ते समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतात, त्यांची नखं कशी कापत येईल, ते काम करून ते ( भुजबळ) बरोबर वेदना देतात आणि बाजूला सरकतात. ते टेकले तरी त्यांच्या अंगातील खोड जाणार नाही अशी टीका जरांगे यांनी केली.
ते त्यांच्यापेक्षा कोणी हुशार असेल तरी दुसऱ्या कोणालाही ओबीसीची नेता होऊ देणार नाही, त्यांच्यापेक्षा फायदा करणारेही असतील तरी पुढे जाऊन देणार नाही. कारण ती खोड असते. भुजबळ यांना जीआर चांगला कळतो. त्यांनी 3-4 चांगले पक्ष हाताळले आहेत बहुमताच्या 5 सत्ता त्यांनी हाताळल्या, त्यांनी प्रत्येक वेळेस कॅबिनेट हाताळली असं जरांगे म्हणाले. कोणी संभ्रम पसरवला तरी त्यातजगायचं नाही, संघर्षाची वाटचाल कायम सुरू ठेवायची असंही त्यांनी मराठा बांधवांना सांगितलं.