आशिया कप स्पर्धा असो की आयसीसी स्पर्धा, दुबळे समजले जाणारे संघ मोठा उलटफेर करून जातात. त्यामुळे दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांना हलक्यात घेणं चांगलंच महागात पडू शकतं. आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार असून 8 संघ सहभागी होणार आहेत. यात हाँगकाँगचा संघही आहे. ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसोबत असणार आहे. हाँगकाँगच्या स्टार खेळाडूवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा नावाचा गवगवा आहे. कारण आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4 षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. इतकंच काय तर भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माची विकेटही काढली होती. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून आयुष शुल्का आहे. त्याची नाळ भारताशी जुळलेली आहे. तसेच हाँगकाँग संघात महत्त्वाची भूमिका बजावतो. आयुष शुक्ला वडिलांसाठी आणि त्यांच्यासाठीच क्रिकेट खेळत आहे.
आयुष शुक्लाने 2022 मध्ये आशिया कप स्पर्धेत भाग घेतला होता. पाकिस्तान आणि भारताविरुद्ध सामना खेळला होता. तसेच रोहित शर्माची विकेट काढली होती. आयुष शुक्लाने क्रिकेट डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘रोहित शर्माची विकेट घेणं हे कायमचं स्मरणात राहील. पण मला टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाण्याची संधी मिळाली म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजतो. रोहित शर्माने माझं मनोबल वाढवलं होतं. तसेच स्वत:वर विश्वास ठेव असं सांगितलं होतं. मला माझ्या देशासाठी निवडलं गेलं आहे. कारण माझ्यात तितकं कौशल्य आहे.’
आयुष शुक्लाने मागच्या वर्षी टी20 वर्ल्डकप आशिया पात्रता फेरीत चार षटकं निर्धाव टाकली होती. मंगोलियाविरुद्ध हा विक्रम रचला होता. आयुषने 24 चेंडू निर्धाव टाकले होते. तसेच एक विकेट घेतला होता. आयुषने पुढे सांगितलं की, मी माझ्या वडिलांच्या जिद्दीमुळेच क्रिकेटर झालो. 15 वर्षांचा असताना मी ब्रिटेनला गेलो होतो आणि तिथे क्रिकेटचे धडे गिरवले. आयुषचे वडील 1996 मध्ये हाँगकाँगला शिफ्ट झाले होते. त्यांनी तिथेच उद्योग करण्यास सुरुवात केली. वडिलांसाठी क्रिकेट खेळत असल्याचं त्याने सांगितलं. त्याच्याकडे पाहूनच वडील त्यांचं स्वप्न जगत असल्याचं देखील त्याने सांगितलं.