Packaged Juice Dangers: पॅकबंद ज्यूस पिणं ठरू शकतं आरोग्यासाठी घातक
Marathi September 06, 2025 06:25 PM

फळे खाल्ल्यावर शरीराला ऊर्जा, फायबर आणि जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळेच लोकांना वाटते की, फळांचा रस पिणेही तितकेच फायदेशीर असते. पण प्रत्यक्षात ही धारणा पूर्णपणे खरी नाही. विशेषतः बाजारात मिळणारा पॅकबंद फळांचा रस आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. (Packed fruit juice health risks)

दुकानात मिळणाऱ्या ज्यूस पॅकांमध्ये फळांचा नैसर्गिक स्वाद टिकवण्यासाठी जास्त प्रमाणात साखर मिसळली जाते. त्याचबरोबर, रस खराब होऊ नये म्हणून त्यात प्रिझर्व्हेटिव्ह्ज म्हणजेच संरक्षक रसायनं घातली जातात. ही रसायने दीर्घकाळ साठवण शक्य करतात, पण मानवी शरीरासाठी अजिबात चांगली नसतात.

यामुळे, अशा रसाचे नियमित सेवन केल्याने मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

ज्यूस आणि सॉफ्ट ड्रिंक्समधील धक्कादायक साम्य

साधारणपणे एका पॅकबंद ज्यूसमध्ये आणि सॉफ्ट ड्रिंक्समध्ये 15 चमचे साखर असते. म्हणजेच एखाद्याने समोर 15 चमचे साखर ठेवली तर आपण ती थेट खाणार नाही, पण ज्यूसच्या स्वरूपात आपण नकळत तेवढीच साखर शरीरात घेतो.

घरगुती रस आणि पॅकबंद रस

  • घरगुती रस : फळांचा ताजा रस घरी काढला तर त्यात गर टिकून राहतो, फायबर मिळते आणि साखरेचे प्रमाण तुलनेने कमी असते. तरीदेखील, तोही प्रमाणातच प्यावा
  • पॅकबंद रस : यामध्ये जास्त साखर, कृत्रिम स्वाद आणि संरक्षक द्रव्यं मिसळलेली असतात. त्यामुळे याचा शरीरावर १०० टक्के अपाय होतो.

काय करावे?

  1. रसाऐवजी थेट फळ खाण्याला प्राधान्य द्या. यामुळे फायबर मिळते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते.
  2. जर रस प्यायचाच असेल, तर घरगुती, साखर न घातलेला लहानसा ग्लास घ्या.
  3. पॅकबंद रस आणि सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.
  4. पाणी आणि ताज्या फळांचा आहार वाढवा.

आरोग्यासाठी फळे सर्वोत्तम असतात. पण बाजारात मिळणारा पॅकबंद फळांचा रस दिसायला आकर्षक आणि चविला गोड असला तरी त्याचे परिणाम शरीरावर घातक असतात. त्यामुळे पुढच्या वेळी रसाचा ग्लास हातात घेताना लक्षात ठेवा की, तो केवळ रस नाही तर साखरेचा मोठा साठा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.