नदी प्रदूषण नियंत्रणासाठी निविदा राबवून उपाय योजा
esakal September 06, 2025 06:45 PM

पिंपरी, ता. ५ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण नियंत्रणासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अनुषंगाने आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आढावा बैठक घेतली. निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून इंद्रायणी आणि पवना नदी पुन्हा स्वच्छ, निसर्गरम्य, प्रदूषणमुक्त करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. नदी पात्रात थेट येणारे सांडपाणी रोखण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांची उभारणी, नाल्यांमधून नदीकडे जाणाऱ्या दूषित पाण्याचे योग्य व्यवस्थापन, औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी यांसह इतर दूषित पाण्यासाठी सांडपाणी प्रकल्प केंद्राच्या (एसटीपी) उभारणीसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. इंद्रायणी आणि पवना नदीतील प्रदूषण दूर करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या अनुषंगाने पुढील ३० वर्षांचे नियोजन करून प्रकल्पाची आखणी करण्याचे निर्देश डॉ. म्हसे यांनी दिले.
या बैठकीस मुख्य अभियंता रिनाज पठाण, सह महानियोजनकार श्वेता पाटील, जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी पाटील, अधिक्षक अभियंता प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
----

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.