कोलगाव-फणसवाडीत
१८ हजारांची दारू जप्त
सावंतवाडी, ता. ५ ः कोलगाव-फणसवाडी येथे पोलिसांनी छापा टाकून १८ हजार १०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली. या प्रकरणी एजाज नासीर शेख (रा. कोलगाव-फणसवाडी) तसेच त्याला दारू पुरवणारा अजित मटकर (रा. सावंतवाडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एजाज शेख हा आपल्या घराच्या परिसरात बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार काल (ता.४) रात्री ९ वाजता पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात विविध ब्रँडची १८ हजार १०० रुपयांची गोवा बनावटीची दारू मिळाली. पोलिसांनी ती जप्त करून शेखला ताब्यात घेतले. चौकशीत ही दारू अजित मटकर याने पुरवल्याचे उघड झाले. त्यामुळे मटकरविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, हवालदार मनोज राऊत, मंगेश शिंगाडे आणि प्रवीण वालावलकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
-------------
मटका स्विकारताना
कोलगावात एक ताब्यात
सावंतवाडी, ता. ५ ः कोलगाव येथे पान टपरीवर मटका स्विकारताना पोलिसांनी संजय वसंत नाईक (वय ५६, रा. कोलगाव निरुखेवाडी) याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून २० हजार रुपयांचा मोबाईल आणि १,१०० रुपये रोख, असे एकूण २१,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाईक हा आपल्या पान टपरीवरून मोबाईलच्या सहाय्याने व्हॉट्सअॅपवर मटका जुगाराचे आकडे घेत होता. पोलिसांनी छापा टाकताच तो जेरबंद झाला. चौकशीत तो आकडे सावंतवाडीतील आणखी एका व्यक्तीला पाठवत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार निलेश परब, हवालदार अनिल धुरी आणि महेश जाधव यांच्या पथकाने केली.
-------------
सावंतवाडीत
उद्या सभा
सावंतवाडी, ता. ५ ः तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा रविवारी (ता.७) सालईवाडा येथे होणार आहे. ही सभा ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्रात सकाळी आयोजित करण्यात आली असून सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सभेत संघाच्या विविध उपक्रमांवर चर्चा होणार असून पुढील कार्ययोजना निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे सर्व सभासद बंधू-भगिनींनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे संघाकडून कळविण्यात आले आहे.
----------------