पुन्हा एकदा चक्रीवादळाचं मोठं संकट निर्माण झालं आहे. हवामान विभागाकडून या पार्श्वभू्मीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळ कीको ने (Cyclone Kiko) चांगलाच जोर पकडला असून, या चक्रीवादळानं आपली लेव्हल बदलली आहे, हे चक्रीवादळ आता लेव्हल चारच खतरनाक चक्रीवादळ बनलं आहे. हे चक्रीवादळ ताशी 215 किलोमीटर वेगानं मार्गक्रमण करत असल्यामुळे हवामान विभागाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे कीको चक्रीवादळाचं सावट असतानाच पोस्ट ट्रॉपिकल चक्रीवादळ लोरेनाने देखील रौद्र रूप धारण केलं आहे, या दोन्ही चक्रीवादळामुळे अतिमुसळधार पाऊस आणि पुराचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळ किकोने रौद्र रूप धारण केलं आहे. या चक्रीवादळाची गती प्रति तास 130 किमीवरून तब्बल 215 किमी प्रति तासावर पोहोचली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ हवाईतील हिलोपासून 1,925 किलोमीटर दूर दक्षिण पूर्वेला असून, ते आता उत्तर पश्चिमेकडे सरकत आहे. याचा मोठा फटका हा अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळ लोरेनामुळे मेक्सिकोत तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे, हवामानशास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार किको चक्रीवादळामुळे हवाई बेटाच्या काही भागांमध्ये उंच आणि धोकादायक लाटा उसळण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अमेरिकेला धोक्याचा इशारा
अमेरिकेच्या हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार किको चक्रीवादळाचा अमेरिकेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एकाचवेळी निर्माण झालेल्या दोन चक्रीवादळामुळे अॅरिझोना आणि न्यू मेक्सिकोमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, आतापर्यंत या प्रदेशात दहा सेंटीमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास पुन्हा एकदा मोठं पूर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे, मात्र सोमवारपासून या चक्रीवादळाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, यामुळे स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.