ऑस्ट्रेलिया ए संघ भारत दौऱ्यावर येणार असून ही मालिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. कारण या मालिकेतून पुढच्या संघाची निवड करणं सोप जाणार आहे. 16 सप्टेंबरपासून भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए संघात दोन अनौपचारिक कसोटी सामने खेळले जाणार आहेत. यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत उतरणार आहे. पहिला सामना पार पडल्यानंतर दुसऱ्या सामन्यात दोन बदल केले जाणार आहे. या सामन्यासाठी केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांची संघात एन्ट्री होणार आहे. त्यामुळे दोन खेळाडूंना बसावं लागणार आहे. ही कसोटी मालिका वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंचं कमबॅक खूप काही सांगून जात आहे. दोन्ही खेळाडू इंग्लंड दौऱ्यात खेळले होते. ही मालिका 4 ऑगस्टला संपली असून तेव्हापासून ब्रेकवर आहेत.
दुसरा कसोटी सामना 23 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. हा सामना लखनौमध्ये होणार आहे. त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे ही अनौपचारिक कसोटी मालिका केएल राहुल आणि मोहम्मद सिराजसठी महत्त्वाची आहे. त्यामुळे या दोघांची वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत निवड जवळपास पक्की मानली जात आहे. दुसरीकडे, आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर कसोटी कर्णधार शुबमन गिल मोकळा होणार आहे. त्याच्याकडे फक्त तीन दिवसांचा ब्रेक असेल.
दुसरीकडे, श्रेयस अय्यरची निवड वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात केली जाण्याची शक्यता आहे. कारण कर्णधारपद सोपवलं आहे, तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर योग्य उमेदवार ठरू शकतो. कारण करुण नायर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत काही खास करू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी संघात स्थान मिळू शकते. तर ध्रुव जुरेलच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा सोपण्यात आली आहे. या संघात ऋषभ पंत नाही. त्यामुळे तो आणखी दिवस भारतीय क्रिकेट संघापासून दूर असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याचं खेळणं कठीण आहे. त्यामुळे त्याची जागा ध्रुव जुरेल घेऊ शकतो.