आठवड्यात सोन्याचे दर 3900 रुपयांनी वाढले, 2025 मध्ये सोनं किती रुपयांनी महागलं?
Marathi September 07, 2025 08:25 PM

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांमध्ये सोने खरेदीचं नियोजन करत असाल तर तुम्हाला सोन्याच्या दरांबाबत माहिती असणं आवश्यक आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सोन्याच्या दरानं नवे उच्चांक गाठले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट सोन्याचा दर 3900 रुपयांनी वाढला आहे. केवळ वायदे बाजाराच नाही तर देशांतर्गत सर्राफा बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याचे दर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 3 ऑक्टोबरला संपणाऱ्या वायद्याच्या सोन्याचे 24 कॅरेट सोन्याचे दर  वाढून 1 लाख 7 हजार 740 रुपयांवर पोहोचले होते. सोने दरानं हा नवा उच्चांक गाठला होता. 29 ऑगस्टला 24 कॅरेट सोन्याचा दर  103824 रुपयांवर होते. शुक्रवारपर्यंत सोन्याचे दर 3916 रुपयांनी वाढून 107740 रुपयांवर पोहोचले आहेत.

2025 मध्ये विविध कारणांमुळं सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरानं जुने विक्रम मोडले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एका तोळ्याचे दर 1 जानेवारीला 79677 रुपयांवर होते. सध्या सोन्याचे दर 107740 रुपयांवर पोहोचले आहेत. या हिशोबानं सोन्याचे दर 28063 रुपयांनी वाढले आहेत. एका महिन्याचा विचार केला असता 7 ऑगस्टला एका तोळ्याचा सोन्याचा दर 101468 रुपयांवर होता. म्हणजेच महिनाभरात सोन्याचे दर 6272 रुपयांची वाढ झाली आहे.

मल्टी कमोडिची एक्सचेंजप्रमाणं देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर वाढले आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार 29 ऑगस्टला 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 102388 रुपयांवर होता. शुक्रवारपर्यंत सोन्याचा दर 106338 रुपयांवर पोहोचला होता. म्हणजेच सर्राफा बाजारात सोन्याचा दर 3950 रुपयांनी वाढला आहे. 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 103790 रुपयांवर पोहोचला आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर जाहीर होणारे सोन्याचे दर देशभर सारखेच असतात. मात्र, ज्या शहरात सोने खरेदी करत असाल तिथं सोन्यावर 3 टक्के जीएसटी द्यावा लागेल. याशिवाय ज्वेलर्सकडून मेकिंग चार्जेस देखील घेतले जातात. त्यामुळं सोन्याचे दर वाढतात.

चांदीचे दर महागले

सोन्याच्या दरात ज्या प्रमाणं वाढ होतं आहे त्याप्रमाणं चांदीच्या दरात देखील वाढ होत आहे. 5 सप्टेंबरला चांदीच्या दरात 374 रुपयांची वाढ झाली.  चांदीचे एका किलोचे दर 123581 रुपयांवर पोहोचले आहेत. सर्राफा बाजारात जीएसटीसह एक किलो चांदीचे दर 127288 रुपयांवर पोहोचला आहे.  वर्षभरात चांदीचे दर 37564 रुपयांनी वाढले आहेत. आयबीजेएकडून एका दिवसात दोन वेळा सोने आणि चांदीचे दर जाहीर केले जातात. भारतासह जगभरात गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याचा विचार करतात.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.