आरएसएसच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीची उद्या सांगता, पत्रकार परिषदेत मिळणार निर्णयांची माहिती
Tv9 Marathi September 07, 2025 08:45 PM

राजस्थानमधील जोधपूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला सुरुवात झाली आहे. 5, 6 आणि 7 सप्टेंबर असे 3 दिवस ही बैठक पार पडत आहे. आज या बैठकीचा दुसरा दिवस होता. आज या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आता उद्या या बैठकीचा शेवटचा दिवस आहे. बैठकीच्या शेवटच्या दिवशी संघाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत या बैठकीत नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

32 वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकाऱ्यांचा सहभाग

दरवर्षी आयोजित केली जाणारी ही बैठक गेल्या वर्षी ही बैठक केरळमधील पलक्कड येथे पार पडली होती. यंदाच्या जोघपूरमधील या बैठकीला संघाच्या विचारांनी प्रेरित असणाऱ्या 32 वेगवेगळ्या संघटनांचे निवडक पदाधिकारी सहभागी झाले आहे. या सर्व संघटना संघाच्या विचारांचे अनुसरन करुन विविध क्षेत्रात काम करत आहेत. सार्वजनिक जीवनात लोकशाही पद्धतीने सामाजिक बदल घडवण्याचा या संघटनांचा प्रयत्न आहे. आता पर्यंत या बैठकीत संघ शताब्दी, पंच परिवर्तन, नवीन शिक्षण धोरण, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आणि आदिवासी क्षेत्रांचा सामाजिक विकास यासारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

डॉ. मोहन भागवत यांचा सहभाग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेही या बैठकीला हजर आहेत. आज सकाळी ते जोधपूरमधील लालसागर येथील सैनिक क्षत्रिय हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यांनी सकाळी 8 वाजता दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते अनंत चतुर्दशीनिमित्त भगवान गणेशाची विशेष पूजा करण्यात आली. तसेच राम दरबारातही पूजा करण्यात आली. यावेळी देश आणि समाजाच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.

हे अधिकारीही बैठकीला हजर

आरएसएसच्या या बैठकीला संघाचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. यात सरकार्यवाहक दत्तात्रेय होसाबळे, सहा सरकार्यवाहक, संघ-प्रेरित संघटनांचे प्रतिनिधी, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, विद्यार्थी परिषद, सेवा भारती इत्यादींसह इतरही अनेक अधिकारी सहभागी झाले आहेत. आता उद्या पत्रकार परिषदेत या बैठकीतील निर्णयांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.