मी मराठा उपसमितीमध्ये होतो, पण फडणवीस यांनी कधीच…, शिवेंद्रराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Tv9 Marathi September 07, 2025 11:45 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली होती, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरातील मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे.

दरम्यान दुसरीकडे मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतलेल्या या भूमिकेला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको तर स्वतंत्र्य आरक्षण द्या अशी ओबीसी समाजाची मागणी आहे, तर दुसरीकडे ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं अशी मराठा समाजाची मागणी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आता मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले शिवेंद्रराजे भोसले?

देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे देखील नेते आहेत, मी मराठा समाज उपसमितीमध्ये होतो अनेक बैठका झाल्या, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी कधीही सांगितलं नाही की, ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यामुळे वंचित घटकाला न्याय मिळत आहे.  प्रत्येक गोष्टीची जाण असणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. आजपर्यंत ओबीसी आणि मराठा समाजाला वापरण्याचे काम काँग्रेसने केलं असं यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या गेवराईमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे. गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ चलो मुंबई असे बॅनर लावले होते, त्यावरून पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच राडा झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा विजयसिंह पाडित यांनी गेवराईमध्ये बॅनर लावले आहेत, मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय, सरकारचे आभार असा मजकूर या बॅनरवर आहे. या बॅनरची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आज हाके गेवराईच्या दौऱ्यावर असल्यानं वातावरण तापण्याची शक्यात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.