दृष्टिक्षेपात
रेल्वे स्थानकात प्रवासी ताटकळत
पावसामुळे गाडीत चढताना त्रास
रेल्वे स्थानकावर बैठकीची गैरसोय
रेल्वे प्रतीक्षा विश्रांतीस्थळावर गर्दी
सुपरफास्ट गाड्यांना प्राधान्य
Konkan Railway Problems : गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासाला लागलेल्या चाकरमान्यांनी सिंधुदुर्गातील रेल्वे स्थानके तुडुंब भरली आहेत. गाड्यांना चार ते पाच तास उशीर होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी बसची तिकिटे कडाडल्याने प्रवास अधिकच कष्टदायक ठरत आहे.
स्थानकांवर प्रवाशांना बसण्यासाठी जागा नाही. पावसामुळे गाडीत चढण्या-उतरण्याचा त्रास होत आहे. प्रतीक्षागृहांमध्ये गर्दीचा त्रास जाणवत असून, ‘सुपरफास्ट’ गाड्यांना प्राधान्य दिल्याने जादा गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. कणकवली स्थानकावर सावंतवाडी–एलटीटी जादा गाडी रात्री ११ ऐवजी पहाटे २ वाजता सुटली. तर मंगळूर–सीएसटीएम सुपरफास्ट एक्स्प्रेस पहाटे ५ वाजता स्थानकात दाखल झाली. नियमित गाड्या १ ते २ तास, तर जादा गाड्या ५ ते ६ तास उशिराने धावत आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील एकमार्गी रचनेमुळे व तमिळनाडू, केरळ, गुजरात, पंजाब आदी लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिल्याने गणेशोत्सवाच्या गाड्या अधिक उशिराने चालवल्या जात आहेत. विशेष म्हणजे, २८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत कोकण रेल्वेवरील सर्व गाड्या ठाणे स्थानकापर्यंतच धावत होत्या. त्यामुळे सीएसटीएम, एलटीटी किंवा दादरपर्यंत आरक्षण असणाऱ्या प्रवाशांना ठाणे येथेच उतरवावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांत नाराजी पसरली होती.
Mumbai Kokan Ro-Ro Ferry: मुंबई–कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! १ सप्टेंबरपासून रो-रो फेरी सेवा सुरू, फ्लाइटपेक्षा कमी खर्चात प्रवासखासगी बसचे दर गगनाला
मुंबई–पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसमध्ये तिकीट दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. साधे तिकीट १२०० ते १५०० रुपये, तर शयनयान प्रवासासाठी तब्बल २२०० रुपये आकारले जात आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांना लुटले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने ६०० बसेस उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांना विशेष सोय मिळत आहे.
खड्डेमय प्रवास कायम
मुंबई - गोवा महामार्गावरील प्रवास मात्र यंदाही खड्ड्यातूनच झाला. महामार्गाचे काम मागील १७ वर्षांपासून सुरू असून, सरकार दरवर्षी नवीन आश्वासन देते. यंदा डिसेंबरअखेर काम पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे; परंतु रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील काम अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.