जुन्नर, ता. ७ : ढोल- ताशांचा गजर, झांज ताफ्याच्या निनाद, गुलाल व फुलांची उधळण करत जुन्नरला सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. घरगुती गणपतींचेही भक्तिभावाने कुकडी नदीघाटावर विसर्जन केले.
जुन्नर शहरातील मानाच्या पंधरा गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुमारे बारा तास चालली. मिरवणुकीत ट्रॅक्टर ट्रॉलीवरील देखावे, सजावट, ढोल ताशा व झांज पथकाचे खेळ पाहण्यासाठी चौका-चौकात परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. गणेश मंडळांनी ट्रॅक्टर ट्रॉलीवर विद्युत रोषणाई, तसेच फुलांची सजावट, मखर, मंदिरांची प्रतिकृती आणि देखावे सादर केले होते. ब्राह्मण बुधवार पेठ शिवप्रेमी गणेश मंडळाने ट्रॉलीवर भारतमाता, तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये बहुमोल कामगिरी बजावलेल्या व्योमिका सिंग व सोफिया कुरेशी यांच्या प्रतिकृती सादर केल्या होत्या.
मानाच्या पहिल्या ग्रामदैवत रविवार पेठ मंडळाच्या श्री गणेशाची आरती सकाळी ११ वाजता आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, तहसीलदार डॉ. सुनील शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, माजी नगरसेवक तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीस सुरवात झाली.
गणेश मंडळांना विसर्जन मार्गावर चौका-चौकात झांज पथकांना खेळ सादर करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ठराविक वेळ दिला होता. तहसीलदार डॉ. शेळके, नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक चरण कोल्हे तसेच विभाग प्रमुखांनी नगर पालिके जवळ मंडळांचे स्वागत केले. मानाच्या पहिल्या मंडळाच्या गणेशाचे विसर्जन रात्री १० वाजता, तर शेवटच्या परदेशपुरा गणेश मंडळाच्या गणेशाचे विसर्जन रात्री १२ वाजता झाले. यंदाची मिरवणूकही डीजेविना पार पडली.
विसर्जन मिरवणूक बंदोबस्तास बाहेर गावावरून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना पुणे जिल्हा ग्रामीण रूरल कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स व जुन्नर शहर डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनच्या वतीने अल्पोपाहार देण्यात आला.
नगरपालिकेने कुकडी नदी तीरावर निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था केली होती. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौद केला होता त्यास नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. पोलिस कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.