यजमान इंग्लंड क्रिकेट टीम पाहुण्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फ्लॉप ठरली. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. त्यानंतर आता उभयसंघात 3 टी 20i सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतं आयोजन हे 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. त्यानंतर यजमान इंग्लंड आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची टी 20i मालिका होणार आहे. यजमान आयर्लंडने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. आयर्लंड क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
आयर्लंड क्रिकेट टीमने टी 20i मालिकेसाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. अनुभवी फलंदाज पॉल स्टर्लिंग नेतृत्व करणार आहे. या मालिकेत मार्क अडायर आणि जोश लिटिल या 2 अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. तसेच निवड समितीने पहिल्यांदाच संघात युवा खेळाडूला संधी दिली आहे. निवड समितीने बेन कॅलटिज याचा समावेश केला आहे.
याआधी आयर्लंडने घरात अनेक संघांविरुद्ध टी 20i मालिका खेळली आहे. मात्र आयर्लंडची घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे. आतापर्यतं इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात फक्त 2 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. आयर्लंडने या 2 पैकी 1 सामना जिंकला. तर 1 सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.
उभयसंघातील पहिला सामना हा 2010 साली खेळवण्यात आला. मात्र पावसाने हा सामना जिंकला. तर दोन्ही संघ तब्बल 12 वर्षांनी पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. आयर्लंड विरुद्ध इंग्लंड दोन्ही संघ 2022 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत आमनेसामने होते. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. मात्र आयर्लंडने या रंगतदार सामन्यात 5 धावांनी बाजी मारली होती. त्यामुळे इंग्लंडसमोर या मालिकेत आयर्लंड विरुद्ध विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे.
आयर्लंडने अखेरची टी 20i मालिका जून महिन्यात खेळली होती. आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिले 2 सामने पावसामुळे रद्द करावे लागले. तर विंडीजने तिसरा आणि सामना जिंकून मालिका नावावर केली. त्यामुळे आयर्लंडचा या मालिकेत विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडसमोर आयर्लंड विरुद्ध पहिला टी 20 विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे. या मालिकेत युवा खेळाडू जेकब बेथल इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे.
पहिला सामना, बुधवार, 17 सप्टेंबर
दुसरा सामना, शुक्रवार, 19 सप्टेंबर
तिसरा सामना, रविवार, 21 सप्टेंबर
इंग्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी आयर्लंड टीम : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), रॉस अडायर, बेन कॅलिट्ज़, कर्टिस कँफर, गैरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, ग्राहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रीज, बॅरी मॅकार्थी, जॉर्डन नील, हॅरी टेक्टर, लोरकन टकर, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.