राज कपूर इस्रायलमध्येही का तुफान लोकप्रिय ठरले? 'इचक दाना' गाण्याचंही आहे खास कनेक्शन
BBC Marathi September 07, 2025 11:45 PM
JH THAKKER VIMAL THAKKER राज कपूर आणि नर्गिस यांची लोकांच्या पसंतीस उतरली

"राज कपूर चित्रपटाच्या निमित्ताने लंडनहून मॉस्कोला गेले होते. काही कारणास्तव त्यांच्याकडे योग्य कागदपत्रं नव्हती. मात्र व्हिसा नसतानाही त्यांना मॉस्कोमध्ये प्रवेश देण्यात आला. कारण ते राज कपूर होते."

"राज कपूर बाहेर पडले आणि टॅक्सीत बसले. मात्र त्यांनी पाहिलं की टॅक्सी पुढे जात नाहिये, उलट टॅक्सी हवेत उचलली जाते आहे. राज कपूर यांना पाहून मॉस्कोमध्ये प्रचंड गर्दी जमा झाली होती. उत्साहाच्या भरात लोकांनी त्यांची टॅक्सीच खांद्यावर उचलून घेतली होती."

ऋषी कपूर यांनी सांगितलेला हा किस्सा थोडासा अविश्वसनीय वाटतो. खरंच असं घडू शकतं का? मात्र या घटनेतून दिसून येतं की, राज कपूर रशियामध्ये (तेव्हाचं सोविएत युनियन) किती प्रचंड लोकप्रिय होते. ही लोकप्रियता त्यांनी 'आवारा' आणि 'श्री 420' सारख्या चित्रपटांमधून आणि कित्येक दशकांच्या कष्टानं कमावली होती.

आजपासून 70 वर्षांपूर्वी म्हणजे 6 सप्टेंबर 1955 ला 'श्री 420' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

'श्री 420' चित्रपटात गावातून शहरात आलेला राज (राज कपूर) पदवीधर असूनदेखील त्याला नोकरी मिळत नाही. त्यामुळे त्याला प्रामाणिकपणासाठी मिळालेलं मेडल तो रद्दीच्या दुकानात गहाण ठेवायला जातो.

त्यावेळी तो म्हणतो, "मला माझा प्रामाणिकपणा विकायचा आहे, प्रामाणिकपणासाठी मिळालेलं बक्षीस विकायचं आहे. या प्रामाणिकपणाची तुम्ही काय किंमत द्याल."

1955 मध्ये आलेला 'श्री 420' या चित्रपटात नैतिकतेबाबतच्या कोंडीची, दुविधेची कहाणी आहे. चित्रपटात राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

एका बाजूला शिक्षित, नैतिक मूल्यं असणारा बेरोजगार तरुण आहे, तर दुसऱ्या बाजूला शहरी झगमगटातील गुन्हेगारी विश्व आहे. या दुसऱ्या मार्गानं श्रीमंत होणं सोपं आहे.

इस्रायली पथकानं ओळखली 'इचक दाना' गाण्याची धून

आज भारतीय चित्रपट जगातील अनेक देशांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याबद्दल, त्यांच्या ग्लोबल लोकप्रियतेबद्दल चर्चा होत असते. मात्र या लोकप्रियतेचे दरवाजे राज कपूर यांनीच भारतीयांसाठी खुले केले होते.

इराण, चीनपासून ते तत्कालीन सोविएत युनियनपर्यंत राज कपूर आणि त्यांच्या या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ असायची.

राज कपूर यांच्या रशियातील लोकप्रियतेची नेहमी चर्चा होत असते. मात्र इस्रायलमध्ये देखील 'श्री 420' या चित्रपटाची गाणी हिट आहेत. तिथे अनेकजण तुम्हाला 'इचक दाना' हे गाणं गाऊन दाखवतील.

RITU NANDA रशियामध्ये नर्गिससोबत राज कपूर, हा फोटो 1954 चा आहे

2018 मध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची टीम भारतात आली होती. त्यावेळी बँडवर 'इचक दाना' हे गाणं वाजत होतं.

त्यावेळी इस्रायलच्या लोकांनी सांगितलं होतं की, त्यांना हे गाणं येतं. हा किस्सा माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी स्वत: प्रसारमाध्यमांना सांगितला होता.

'श्री 420' हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला होता की, इराणमध्ये देखील त्याचा प्रीमियर ठेवण्यात आला होता. तिथे सूटाबुटात आलेल्या राज कपूर यांना पाहून तिथल्या लोकांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली होती.

उजबेकिस्तानमध्ये हा चित्रपट आजदेखील 'जनॉब 420' या नावानं प्रसिद्ध आहे.

राज कपूर यांचं भारतावरील प्रेम आणि देशातील परिस्थितीवर व्यंग

'श्री 420' चित्रपटातील मुकेश यांनी गायलेलं 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' हे गाणं एकप्रकारचं नॅशनल अँथमच झालं होतं.

या गाण्यातून भारतावरील प्रेम दिसून येतं. मात्र 'श्री 420' चित्रपटात भारतातील सामाजिक, आर्थिक आणि नैतिक स्थितीवर प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. अंध-राष्ट्रभक्तीतील ही विसंगती हेच या चित्रपटाचं सौंदर्य आहे.

अनेक छोट्या दृश्यांमधून राज कपूर राजकीय टिप्पणी किंवा व्यंग करतात.

Film Heritage Foundation राज कपूर यांनी चित्रपटातून राजकीय टीका टिप्पणीदेखील केली

उदाहरणार्थ, चित्रपटाच्या सुरुवातीला राज कपूर समुद्रकिनाऱ्यावर शीर्षासन करत असतात. तेव्हा एक हवालदार येऊन त्यांना ओरडू लागतो.

त्यावर राज कपूर म्हणतात, "हवालदार साहेब खरी गोष्ट अशी आहे की, या उलट्या जगाला सरळ पाहायचं असेल तर डोक्यावर उभं राहावं लागतं. तुम्हाला माहीत आहे का हवालदार साहेब, मोठे-मोठे नेते सकाळी उठून शीर्षासन करतात. तेव्हा कुठे त्यांना देशाला योग्य स्थितीत आणता येतं."

हा संवाद ऐकून तुम्ही मनोमन हसता.

राज कपूर, नर्गिस आणि पाऊस

'श्री 420' पाहिल्यावर हा चित्रपट इतका हिट का झाला हे लक्षात येणं कठीण नाही.

चार्ली चॅप्लिनसारख्या साध्या-सरळ नवख्या व्यक्तीच्या रुपातील राज कपूर आणि त्यांच्या प्रेमात बुडालेल्या नर्गिस...

आजदेखील या दोघांना पावसात एक छत्रीखाली 'प्यार हुआ इक़रार हुआ है' हे गाणं गाताना आपण पाहतो किंवा ऐकतो, तेव्हा असं वाटतं की, त्या दिवसाच्या पावसात अजूनही प्रेमी युगुलं भिजत आहेत.

मात्र 'श्री 420' हा चित्रपट फक्त पाऊस आणि रोमान्स एवढ्यापुरताच नाही. तो त्याच्याही पलीकडेच बरंच काही सांगतो.

Randhir Kapoor 'प्यार हुआ इक़रार हुआ है' हे गाणं खूप गाजलं होतं

'श्री 420' चित्रपट 1955 मधील भारताचं चित्र रेखाटतो. असा देश जो स्वतंत्र झाला आहे. मात्र तिथल्या शिक्षित लोकांकडे नोकरी नाही. तिथे गरीब-श्रीमंतांमध्ये प्रचंड मोठी दरी आहे. तरुणांना नोकरी, रोजगाराच्या शोधात नाईलाजानं गावांमधून शहरांमध्ये जावं लागतं आहे.

चित्रपटाचा नायक असलेला राज देखील प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालतो. मात्र त्याच्या हाती काहीही येत नाही. अशापरिस्थितीत राजला बेरोजगारी आणि गरीबी किंवा गुन्हेगारी आणि श्रीमंती यापैकी एकाची निवड करायची असते. तो गुन्हेगारीची निवड करतो.

हे मायाच्या (अभिनेत्री नादिरा) माध्यमातून होतं. मायाच्या लक्षात येतं की, राजकडे पत्ते निवडण्याचं कौशल्य आहे. त्या कौशल्याचा वापर करून ती भरपूर कमाई करू शकते.

मात्र तिच्यासमोर आव्हान आहे विद्याचं, म्हणजेच नर्गिस यांचं. विद्याचं राजवर प्रेम आहे.

'मुड़ मुड़ के न देख'

या चित्रपटातील 'मुड़ मुड़ के न देख' हे गाणंदेखील खूप लोकप्रिय आहे. गीताचे शब्द, प्रकाशयोजना आणि सावल्यांच्या खेळातून राज कपूर यांच्या वैचारिक कोंडीला खूप क्रिएटिव्हपणे दाखवण्यात आलं आहे.

या दृश्यात राज कपूर दिवाळीच्या रात्री सण साजरा करण्यासाठी नर्गिस यांना एका महागड्या हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन जातात.

साधारण शाळेत शिक्षिका असलेल्या नर्गिस यांच्या लक्षात ही बाब लगेच येते की, राज कपूर यांनी हे पैसे चुकीच्या मार्गानं कमावले आहेत. त्या राज कपूर यांना सोडून हॉटेलातून जाऊ लागतात.

तेव्हा राज मागे वळून विद्याला पाहत असतो. त्यावेळेस माया म्हणजे नादिरा गाणं गाऊ लागतात, 'मुड़ मुड़ के न देख, मुड़ मुड़ के'.

RK Films राज कपूर आणि नादिरा

गाण्याच्या या क्षणांमध्ये तुम्हाला दिसेल की, राज कपूर दरवाजाच्या उंबरठ्यावर संभ्रमावस्थेत उभे आहेत आणि त्यांच्या सर्व बाजूला अंधार आहे.

मग अचानक त्यांच्या चेहऱ्यावर प्रकाश येतो. बॅकग्राऊंडमधून ते फोरग्राऊंडमध्ये येतात आणि त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असतं.

काहीही न सांगता तुमच्या लक्षात येतं की, राजनं प्रामाणिकपणाचा उंबरठा ओलांडत गैरमार्ग स्वीकारला आहे आणि तो विद्याच्या जगातील मायाच्या जगात दाखल झाला आहे.

सिनेमॅटोग्राफर राधू करमाकर यांनी प्रकाशाचा उत्कृष्ट वापर करत हा सर्व प्रसंग, त्यामागच्या भावना कोणत्याही संवादाशिवाय प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत.

मग फक्त एक संवाद आहे, "इस रास्ते पर तुम्हें विद्या की नहीं माया की ज़रूरत है."

'मुड़ मुड़ के न देख' हे आशा भोसले यांच्या करियरच्या सुरुवातीच्या काळातील हिट गाणं होतं. या गाण्यात तुम्हाला बॅकग्राऊंडला नाचणारी साधनादेखील दिसेल. साधना तोपर्यंत अभिनेत्री म्हणून लाँच झाली नव्हती.

मुकेश अभिनयात व्यग्र, मग मन्ना डे यांनी गायली गाणी

या चित्रपटातील गाण्यांबद्दल सांगायचं तर राज कपूर यांचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश यांनी 'श्री 420' चित्रपटातील सर्व गाणी गायलेली नाहीत. 'प्यार हुआ' आणि 'दिल का हाल सुने दिलवाला' ही गाणी मन्ना डे यांनी गायली आहेत.

त्यामागचं कारण म्हणजे, त्यावेळेस मुकेश गायनाबरोबरच अभिनयावरदेखील लक्ष देत होतं. ते 'अनुराग' सारख्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र होते.

राज कपूर यांचे उर्वरित सहकारी मात्र तेच होते. शंकर-जयकिशन हे संगीतकार होते, तर हसरत जयपुरी आणि शैलेंद्र गीतकार होते.

HARPER COLLINS गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर-जयकिशन आणि गीतकार शैलेंद्र यांच्याबरोबर राज कपूर

राज कपूर यांचे उर्वरित सहकारी मात्र तेच होते. शंकर-जयकिशन हे संगीतकार होते, तर हसरत जयपुरी आणि शैलेंद्र गीतकार होते.

'श्री' सुद्धा आणि '420' सुद्धा

या चित्रपटातील चरित्र अभिनेतेदेखील मोठी छाप सोडून जातात. उपाशी असलेला राज मुंबईत भटकत असतो, तेव्हा एक गरीब केळेवाली (ललिता पवार) त्याला सहानुभुती दाखवते.

चित्रपटात मोठ्या शहरांमधील असंवेदनशीलता देखील दाखवण्यात आली आहे.

उदाहरणार्थ, एका दृश्यात नर्गिस केळीच्या सालीवरून घसरतात. तेव्हा सर्वजण त्यांच्यावर हसतात. त्या हसणाऱ्यांमध्ये राज कपूरदेखील असतात.

थोड्या वेळानं राज कपूर देखील त्याच केळीच्या सालीवरून घसरून पडतात. तेव्हा सर्वजण त्यांच्यावर हसू लागतात. त्यातील एकजण म्हणतो, "यह बम्बई है मेरे भाई, यहाँ दूसरों को देखकर सब हँसते हैं."

RK Films रशियात चाहत्यांबरोबर राज कपूर

ख्वाजा अहमद अब्बास यांची ही कहाणी तसं पाहता नैतिक मूल्यांविषयीची कहाणी आहे. मात्र ही कहाणी स्थलांतरितांचा प्रश्नदेखील मांडते, जे आजही सुरू आहे.

चित्रपटाच्या शीर्षकातील 'श्री' आणि '420' हे दोन्ही शब्द विसंगत वाटतात.

बहुधा राज कपूर आणि ख्वाजा अहमद अब्बास यांना त्यातून सांगायचं असेल की, अनेकदा धूर्त आणि फसवणूक करणारे लोक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असण्याच्या आड दडलेले असतात. त्यामुळेच 'श्री' आणि '420' या दोन शब्द म्हणजे रुपांना एकत्र करून तयार झाला 'श्री420'.

शेवटी, एक छोटीशी मात्र महत्त्वाची गोष्ट. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत आधी नर्गिस आणि नादिरा यांचं नाव येतं आणि मग राज कपूर यांचं नाव येतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • एम. एस. शिंदे : 3 लाख फुटांच्या फुटेजमधून साडे तीन तासांचा 'शोले' घडवणारा मराठी एडिटर
  • आर. के. स्टुडिओ : राज कपूर यांच्या स्वप्ननगरीच्या उभारणीच्या संघर्षाची आणि अस्ताची कहाणी
  • राज कपूर@100 : अवघ्या 26 व्या वर्षी जगभर ख्याती पोहोचलेला, चित्रपटसृष्टीवर 'राज' करणारा माणूस
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.