घाटनांदूर - येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दोन दुकानांना आग लागली आणि त्यापाठोपाठ बाजूला असलेल्या हॉटेलमधील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत सोमेश्वर वडापाव हॉटेल आणि त्याच्या बाजूला असलेले ठिबक सिंचन साहित्याचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले, ज्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना (ता.५) शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान घडली.
ही आग इतकी भीषण होती की, हॉटेलमधील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आगीची तीव्रता आणखी वाढली. स्थानिक लोकांनी तातडीने अंबाजोगाई व परळी येथील अग्निशमन दलाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई अग्निशमन दलाची गाडी १०:४० वाजता घटनास्थळी पोहोचली आणि आग शमविण्याचे काम सुरू झाले.
तसेच पोलिसही मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील गर्दी हटवून मदतकार्य सुरू केले. यामुळे मदतकार्यात कोणताही अडथळा आला नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.