एसटी बसचा अपघात
esakal September 08, 2025 12:45 AM

एसटी बसचा अपघात
प्रवासी किरकोळ जखमी
कल्याण ता. ७ (वार्ताहर) : कल्याण एसटी आगाराच्या बस अपघातांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. बसचे पुढील चाक निखळून झालेल्या अपघाताला काही आठवडे उलटत नाहीत तोच रविवारी (ता. ७) सकाळी बसचा स्टिअरिंग रॉड तुटून अपघात झाला. या वेळीही ही बस झाडाला आदळल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये चालकासह पाच ते सहा प्रवासी जखमी झाले आहेत.

कल्याण आगाराची एसटी २० ते २५ प्रवाशांना घेऊन माळशेजमार्गे आळेफाटा येथे निघाली होती. मुरबाडच्या पुढे असलेल्या गावाजवळून ही बस जात असताना अचानक या बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने ही बस थोडी पुढे जाऊन रस्त्यावरून खाली उतरली आणि रस्त्याशेजारी झुडपांमध्ये असलेल्या झाडाला या बसने धडक दिली. यामध्ये बसच्या उजव्या भागाचे नुकसान झाले. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ मार लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. वाहकालाही मुक्का मार लागल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ही बस झाडाला धडकल्याने मोठा अपघात टळला. काही अंतरावर पुढे असलेल्या माळशेज घाटामध्ये हा अपघात घडला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. या अपघाताबाबत कल्याण एसटी आगाराचे व्यवस्थापक महेश भोये यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. काही आठवड्यांपूर्वीही कल्याण एसटी आगाराच्या बसचे पुढचे चाक निखळून अपघात झाला होता. त्यापाठोपाठ आता स्टिअरिंग रॉड तुटून झालेल्या अपघाताचा विचार करता कल्याण आगारातील बसच्या देखभाल- दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.