शास्ती कर अभय योजनेला मुदतवाढ
esakal September 08, 2025 10:45 AM

वडगाव मावळ, ता. ७ : वडगाव नगरपंचायतीने मालमत्ता करावरील शास्ती (दंडात्मक व्याज) माफीसाठी राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेला येत्या ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वडगाव नगरपंचायत हद्दीतील ज्या थकबाकीदार मिळकतधारकांची शास्तीची थकबाकी आहे, अशा मिळकतधारकांनी मुदतीत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे.
मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी सांगितले की, ‘‘शासनाने १९ मे २०२५ रोजी मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वडगाव नगरपंचायतीमार्फत प्रस्ताव स्वीकारणे सुरू आहे. अभय योजनेसाठी यापूर्वी ३० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. नागरिकांच्या मागणीनुसार या योजनेला आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या थकबाकीदार मिळकतधारकांची शास्तीची थकबाकी आहे, अशा मिळकतधारकांनी मुदतीत मालमत्ता करावरील शास्ती अंशतः/पूर्णतः माफ करण्यासाठी शास्ती वगळून मिळकतकराची पूर्ण रक्कम भरून विहित नमुन्यात अर्ज नगरपंचायत कार्यालयाकडे सादर करावा.
अभय योजना एकदाच (२०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिताच) लागू आहे. ही योजना थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी प्रोत्साहनपर आहे. जे मिळकतधारक अभय योजनेचा लाभ घेऊ इच्छितात, अशा मालमत्ताधारकांनी सवलत मागणीकरता परिपूर्ण प्रस्ताव नगरपंचायतीकडे सादर करावा. अर्जाचा विहित नमुना नगरपंचायत कार्यालयात तसेच www.npvadgaon.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्या नमुन्यातच अर्ज सादर करावा. शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. कराचा भरणा करण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहे. शास्तीची रक्कम वगळून उर्वरित कराची रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरणा करावी. अधिक माहितीसाठी नगरपंचायतीचा कर विभाग संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.