Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले
esakal September 08, 2025 10:45 AM

Landslide Survey Karun Ghat : दरडींमुळे धोकादायक ठरलेल्या करूळ घाटरस्त्याची पाहणी शुक्रवारी (ता. ५) तज्ज्ञांच्या पथकाकडून करण्यात आली. सर्वेक्षणानंतर या पथकाने पाच ठिकाणे अतिशय धोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, घाटात कोसळलेली दरड हटविण्याचे काम थांबविण्यात आले आहे.

करूळ घाटात गुरुवारी (ता. ४) सकाळी सुमारे आठ वाजता मोठी दरड कोसळली होती. महाकाय दगड रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. महामार्ग प्राधिकरणाने दोन जेसीबी आणि एक ब्रेकरच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू केले होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा काम सुरू करण्यात आले.

मात्र, दुपारनंतर ते थांबविण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर दरडीचा बहुतांश भाग अद्याप पडून आहे. दरड कोसळलेल्या ठिकाणी अजूनही भेगा असल्याने पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय घाटात इतर ठिकाणीही दरडी कोसळण्याचा धोका असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी करूळ घाट मार्ग १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी १५ ते २० जणांचे तज्ज्ञांचे पथक घाटात दाखल झाले आणि दिवसभर सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणाअंती पाच ठिकाणे अत्यंत धोकादायक असल्याचे निश्चित झाले. कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असलेल्या दरडी तातडीने पाडाव्यात, असा सल्ला पथकाने दिला आहे. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता वृषाली पाटील यांनीही शुक्रवारी घाटाची पाहणी केली.

करूळ घाटरस्त्यांचे तज्ज्ञ पथकाने सर्वेक्षण केले असून, पाच ठिकाणे अतिशय धोकादायक असल्याचे सांगितले आहे. तसेच, कोसळलेल्या ठिकाणी अजून दरड कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे दरड हटविण्याचे काम सायंकाळी थांबविण्यात आले.

- वृषाली पाटील, कार्यकारी अभियंता, महामार्ग प्राधिकरण

Karul Ghat : करूळ घाटात पुन्हा दरड कोसळली; वैभववाडी-कोल्हापूर महामार्गावर वाहतूक ठप्प

घाट बंद कालावधी वाढण्याची शक्यता

करूळ घाट अनेक ठिकाणी ढासळलेला आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तर काही ठिकाणी मुरूम सरकत आहे. तज्ज्ञ पथकाने पाच ठिकाणे धोकादायक असल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात दहा ते पंधरा ठिकाणे धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. ही सर्व ठिकाणे सुस्थितीत आणण्यासाठी किमान पंधरा ते वीस दिवस लागू शकतात. त्यामुळे सध्या १२ सप्टेंबरपर्यंत रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय असला, तरी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.