पिंपरी, ता.७ : ढोल-ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’’ असा करीत पिंपरी कॅम्पमधील पवना नदीवरील सुभाष घाट (झुलेलाल घाट), वैभवनगर आणि शिवराज्य चौकात उभारलेल्या कृत्रिम विसर्जन हौदांवर घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या घाटांवर शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून भाविक आपल्या लहानग्यांसह सहकुटुंब उपस्थित होते.
या विसर्जन केंद्रावर विधीवत पूजा, आरती, मंत्रोच्चार यामधून भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. चिमुकल्यांनी आपल्या घरातील लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून गणेशभक्तांच्या आनंदात भर टाकत होत्या. घाट परिसरात निर्माल्य आणि मूर्तीदानासाठी अनेक सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते सज्ज होते. या हौदांमध्ये मंडळांसह घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाची चोख व्यवस्था होती.
महापालिकेकडून चोख नियोजन
गणेश विसर्जन सुरळीत, सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयारी केली होती. नागरिकांच्या सुरक्षेसोबतच आरोग्य सुविधा, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन यासाठी महापालिकेच्या विविध विभागांकडून नियोजन होते. पर्यावरण, आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, स्थापत्य, सुरक्षा असे महापालिकेचे विविध विभाग समन्वयाने काम करत होते. शहरातील विसर्जन घाटांवर प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, वाहनतळ, वैद्यकीय सुविधा, सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूक नियोजनाची सोय केली होती. या घाटावर प्रशिक्षित जीवरक्षक पथके, रेस्क्यू बोट, लाइफ जॅकेट्स, लाईफ रिंग्स आदी सुविधा उपलब्ध होती.
चार हजार मूर्तींचे विसर्जन
शिवराज्य चौकातील कृत्रिम विसर्जन घाट व मूर्ती संकलन केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाला. येथे सुमारे चार हजारांपेक्षा अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नागरिकांच्या सेवेसाठी सुमारे भव्य मंडप उभारण्यात आला. तर, महाप्रसादाचीही व्यवस्था होती.
कृत्रिम हौदात ३० हजार मूर्तींचे विसर्जन
वैभवनगर येथे आसवानी असोसिएट्स यांनी दोन इकोफ्रेंडली कृत्रिम हौद तयार केले होते. तेथे सकाळपासूनच घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू होते. सकाळी सात ते रात्री ८.१५ वाजेपर्यंत सुमारे ३० हजार गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. भाविकांचा फोटो काढण्यासाठी इकोफ्रेंडली स्कॅनरची सोय केली होती.
घाटांवर सामाजिक संस्थांचे योगदान
पिंपरी कॅम्पमधील सुभाष घाट (झुलेलाल घाट)वर नवनिर्माण काच, पत्रा, कष्टकरी संघटना, एमक्यूअर सामाजिक संघटना श्री मूर्ती संकलन करत होते. नवनिर्माण काच, पत्रा, कष्टकरी संघटनेने रिसायलिंगसाठी मूर्ती संकलित केल्या होत्या.
काही वेळातच परिसर स्वच्छ
मिरवणूक मार्ग व घाटांवर सामाजिक संस्थाचे स्वयंसेवक सेवा बजावत होते. काच-पत्रा महिला कामगार संघटनेच्या आणि महापालिकेच्या कंत्राटी एक हजार महिला ठिकठिकाणी स्वच्छता करीत होत्या. त्यामुळे मिरवणुकीनंतर काही वेळातच परिसर स्वच्छ करण्यात येत होता.
हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ
पिंपरीतील व्यापाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह भाविकांसाठी फूड पॅकेट, पाणी, सरबताचे वाटप करण्यात आले. थेरगावातील चर्तुभूज प्रशांत मांडरे यांनी कराची चौकात भाविकांना अन्नदान केले. भविकांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आसवानी असोसिएट्सने भाविकांसाठी पाणी, चहा, समोसाची सोय केली होती.