पालघर : नारंगी जलसार रो-रो फेरीबोटीच्या तत्परतेमुळे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा जीव थोडक्यात वाचला. विरार पश्चिमेतील नारंगी जेट्टीवर शनिवारी (ता. ६) दुपारी तीन वाजता ही घटना घडली. एका भक्ताचा पाय घसरून तो खाडीत पडला. त्याला वाचवण्यासाठी अन्य दोघांनीही खाडीत उडी घेतली; मात्र ओहोटीमुळे तिघेही खाडीपात्रातून समुद्राच्या प्रवाहात वाहत जाऊ लागले. याची माहिती मिळताच महाराष्ट्र सागरी मंडळाचे बंदर निरीक्षक नवनीत निजाई यांनी रो-रो बोटीवरील कर्मचारी आदेश नाईक यांना तातडीने संपर्क साधला. त्यानंतर रो-रो बोट आणि इतर मच्छीमार बोटी नदीतील घटनास्थळी धावून गेल्या. काही वेळातच बुडणाऱ्या तिन्ही व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.