वाल्हे, ता. ७ : वाल्हे (ता. पुरंदर) गावामध्ये ‘पर्युषण पर्व की जय, अहिंसा धर्म की जय, जैन धर्म की जय’ अशा जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात जैन बांधवांनी पर्युषण पर्वाची सांगता अत्यंत भक्तिभावाने केली. यानिमित्ताने भगवान आदिनाथ व पद्मावती मातेच्या मूर्तींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. ग्रामप्रदक्षिणेदरम्यान पुरूषांसह महिला डोक्यावर कुंभ घेऊन सहभागी झाल्या होत्या.
भाद्रपद शुद्ध पंचमीपासून सुरू होणाऱ्या पर्युषण पर्वाचा समारोप भाद्रपद पौर्णिमेला झाला. या अकरा दिवसांच्या काळात काही जैन बांधवांनी सलग उपवास करत संयमाचे पालन केले, तर मंदिरात रोज सकाळी आदिनाथांच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक करण्यात आला. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला अभिषेक करण्याचा मान देण्यात आला. बाल श्रावकांसाठी विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पर्वानंतर सांगता समारंभ साजरा झाला.
पारंपारिक वाद्याच्या तालावर वाल्हेगावांतर्गत भगवान महावीरांच्या पालखी सोहळ्याची मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीनंतर पालखी मंदिरामध्ये विसावल्यानंतर पांडूशिलेवर शितल उपाध्ये यांनी अभिषेक केला व चढावे(बोली) पार पडले. या पालखी सोहळ्यामध्ये शिरीष शहा, पराग शहा, उमेश शहा, प्रकाश शहा, विनय शहा, प्रदिप शहा, अमोल कोठाडिया, संजय दोशी, सुरज शहा, अतुल शहा, मनोज शहा, सचिन दोशी, भुषण शहा यांच्यासह आदी जैन बांधव सहभागी झाले होते.
या पालखी सोहळ्यात दिगंबर व श्वेतांबर या दोन्ही पंथांचे श्रावक-श्राविक एकत्र सहभागी झाले होते, यामुळे धार्मिक एकात्मतेचा संदेशही सर्वांपुढे आला. मिरवणुकीदरम्यान महिलांनी डोक्यावर आणलेले कुंभामध्ये आणलेल्या जलाने मुर्तीवर जालाभिषेक करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान श्राविक श्राविकांचे गरबा नृत्य आकर्षण ठरले. पर्यषण कालावधीमध्ये पुणे येथील विनय शहा यांच्या वतीने अकरा दिवस अन्नदान करण्यात आले. शेवटी बाल व जेष्ठ श्रावक व श्राविकांनी क्षमावली दिवस साजरा करण्यासाठी आदिनाथांना क्षमायाचना मागुन पर्वाची सांगता झाली.