Kolhapur News: 'रेबीजसदृश आजारामुळे एकाचा मृत्यू'; पुलाची शिरोली येथील घटना, दोनवेळा कुत्र्यांचा चावा
esakal September 09, 2025 12:45 PM

नागाव : पुलाची शिरोली येथे रेबीजसदृश आजारामुळे एकाचा मृत्यू झाला. तानाजी श्रीरंग साळुंखे (वय ४२, सध्या रा. साई कॉलनी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, मूळ रा. ढवळेश्वर, ता. विटा, जि. सांगली) असे त्यांचे नाव आहे. कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असताना आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला. सीपीआर पोलिस चौकीत याची नोंद झाली आहे.

आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासा

याबाबत अधिक माहिती अशी, तानाजी साळुंखे यांना शुक्रवारी (ता. ५) सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराशेजारी एक कुत्रे चावले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना पाण्याची भीती वाटत असल्यामुळे खासगी रुग्णालयातून कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज दुपारी अडीचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दीड महिन्यापूर्वी ते मुलीसाठी चिकन सिक्स्टी फाय आणण्यासाठी शिरोली फाटा येथील भाऊ गल्ली येथे गेले होते.

त्यावेळी कुत्रे आडवे आल्यामुळे मोटारसायकलवरून पडून तानाजी साळुंखे जखमी झाले होते. त्यावेळी त्यांना कुत्र्याने चावा घेतला असावा; पण मोटारसायकलवरून पडल्यामुळे त्यांना हाताला झालेली जखम गंभीर वाटत होती. त्याच्यावरती त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतला होता. मात्र, कुत्रे चावल्याकडे दुर्लक्ष केल्याने रेबीजचे इंजेक्शन घेतले नव्हते. दीड महिन्याच्या कालावधीत शुक्रवारी त्यांना पुन्हा कुत्र्याने चावा घेतला. रात्री उशिरापर्यंत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.

Honesty Employee :'साईंच्या दरबारातील टोकाचा विरोधाभास'; कंत्राटी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतुक

‘तानाजी साळुंखे यांच्यावर पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणतेही उपचार झालेले नाहीत. मात्र, ज्या पद्धतीने त्यांच्या संदर्भातील माहिती मिळत आहे, यावरून ही रेबीजची घटना असू शकते.

- जेसिका अँड्रोस, वैद्यकीय अधिकारी, पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.