Shivaji Maharaj : कोल्हापुरात जपून ठेवल्या आहेत शिवाजी महाराजांच्या अस्थी...आजही शिवभक्त घेतात दर्शन!
esakal September 10, 2025 06:45 AM

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं दैवत. अशा या दैवताने ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजाराम महाराजांनी महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. तसेच त्यांच्या शिवरक्षा व अस्थी रायगडावरील जगदीश्वर मंदिराजवळ पुरण्यात आल्या. या घटनेला आता जवळपास ३४५ वर्षे उलटली आहेत. पण, तुम्हाला जर म्हटलं की या अस्थी आजही जपून ठेवण्यात आल्या आहेत? तर.. तर आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. कोल्हापुरात आजही महाराजांच्या अस्थी जपून ठेवण्यात आल्या आहेत. अनेक शिवभक्त आजही या अस्थींच दर्शन घेऊ शकतात.

महात्मा फुले आणि टिळकांचा पुढाकार

१८९० च्या दशकात महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा शोध लावला. त्यानंतर त्यांनी या समाधीच्या जिर्णोद्धाराची घोषणा केली. त्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करत निधी गोळा करण्यात आला. याच काळात, १८९५ मध्ये लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि समाधीच्या जिर्णोद्धाराला गती मिळाली. यावेळी कोल्हापूर संस्थानने जीर्णोद्धाराची जबाबदारी घेण्याचं जाहीर केलं. पण टिळकांनी हा प्रस्ताव फेटाळला.

Shivaji Maharaj : साताऱ्यात आजही जपून ठेवला आहे शिवरायांच्या पुजा घरातील 'बाण'; इंदिरा गांधींनीही घेतलं होतं दर्शन जिर्णोद्धाराचे काम सुरू

यावेळी टिळकांनी ठामपणे सांगितले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त त्यांच्या वंशजांचे नाहीत, तर संपूर्ण समाजाचे आहेत. त्यामुळे समाधीचा जिर्णोद्धार लोकवर्गणीतूनच व्हावा". टिळकांच्या आग्रहामुळे संस्थानने माघार घेतली. त्यानंतर रायगड स्मारक समिती आणि ब्रिटिश सरकारच्या सहकार्याने जिर्णोद्धाराचे काम सुरू झाले.

शिवरक्षा आढळून आल्या

रायगड तेव्हा कुलाबा जिल्ह्याचा भाग होता. या कामाची देखरेख कुलाब्याच्या चीफ इंजिनीअरने केली. हे काम बाळकृष्ण मोरेश्वर सुळे उर्फ तात्यासाहेब सुळे या कंत्राटदाराला देण्यात आले. १९२६ मध्ये जिर्णोद्धाराचे काम प्रत्यक्ष सुरू झाले. त्यावेळी सुमारे सहा फूट खोल खणल्यानंतर एका दगडी पेटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थी आणि रक्षा आढळून आल्या.

Shivaji Maharaj Ancestral Village : कसं आहे शिवरायांचं मराठवाड्यातील मूळ घर? उत्खननात सापडल्या होत्या ऐतिहासिक वस्तू... अन् रक्षेचा काही भाग काढून घेतला...

ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी हादरवून टाकणारी होती. तिथे उपस्थित असलेल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने याची माहिती कुलाब्याच्या वरिष्ठांना पत्राद्वारे कळवली. या पवित्र रक्षेची बातमी पसरताच, संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाची लाट उसळली. कंत्राटदार तात्यासाहेब सुळे यांनी या रक्षेचा काही भाग काढून घेतला, तर महादेव वडके यांनीही रक्षेचा काही भाग जपून ठेवला.

इथे आजही आहेत शिवरक्षा

याशिवाय कोल्हापूरच्या राजवाड्यात शिवरक्षेचा काही भाग पाठवण्यात आला. कोल्हापूरच्या छत्रपतींनी यासंदर्भात लिहिलेलं पत्र आजही उपलब्ध आहे. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थींचा शोध हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या घटनेने शिवरायांवरील लोकांची श्रद्धा अधिक दृढ झाली. त्यांच्या रक्षेचा काही भाग आजही कोल्हापुरातील राजवाड्यात जपून ठेवण्यात आला आहे. अनेक शिवभक्त त्याचं दर्शन घेऊ शकतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.