Nepal Gen Z Protest : वाढता भ्रष्टाचार, घराणेशाही आणि सोशल मीडियावरूल बंदी या सर्वांचा उद्रेक होऊन नेपाळमधील सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. मात्र आंदोलकांना थोपवताना सोमवारी केलेल्या गोळीबारात 19 जणांचा मृत्यू झाला तर शेकडो जखमी झाले. यामुळे संतप्त निदर्शकांनी मंगळवारीही निदर्शने सुरूच ठेवली. त्यामुळे नेपाळमध्ये (Nepal Protest ) मोठा हिंसाचार झाला. जेन-झीने सरकारविरोधात केलेली निदर्शनं मंगळवारी आणखीनच उग्र झाली. निदर्शक एवढे संतापले होते की त्यांनी पार्लमेटसह अनेक इमारतींची जाळपोळ केली. अनेक मंत्र्यांची घरेही पेटवली. नेपाळमधील सध्याची परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे. निदर्शनांदरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. वेगाने बिघडणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
यामुळे देशात अफरातफरी, अराजक माजले असून याचा पार्श्वभूमीवर काठमांडूमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळासह देशातील सर्व विमानतळे ही बंद ठेवण्यात आली आहे. बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व विमानतळे बंद करण्यात आले आहेत. वाढत्या अशांततेमुळे मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. या निर्णयानंतर, मंगळवारी दुपारपासून कोणतेही विमान उड्डाण किंवा उतरू शकले नसल्याने शेकडो प्रवासी नेपाळमध्ये अडकले आहेत. त्यामध्ये शेकडो भारतीयांचाही समावेश आहे.
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच बुधवारी दुपारनंतर विमानतळ उघडण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या, नेपाळ सैन्य हे विमानतळाच्या आत आणि बाहेर तैनात करण्यात आले असून सर्वत्र त्यांनी नियंत्रण मिळवले आहे. मात्र सद्यस्थिती पाहता विमान आणि प्रवाशांची एकूण सुरक्षा हे गंभीर प्रकरण आहे.
हेल्पलाईन नंबर जारी
वाढत्या हिंसाचारानंतर नेपाळमध्ये हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. जर तुमच्या घराभोवती काही असामाजिक कृत्य घडत असेल किंवा तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल तर कृपया आपत्कालीन हेल्पलाइनला कळवावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. नेपाळ आर्मी: 01-5979223 आणि 01-5979224, एपीएफ नेपाळ: 1114, नेपाळ पोलिस: 100, नेपाळ आर्मी मुख्यालय: सुरक्षा/वैद्यकीय मदत/अग्निशमन दलासाठी कृपया 015979223 किंवा 015979224 वर कॉल करा असे सांगण्यात आले आहे.
अडकले शेकडो भारतीय
नेपाळमधील निदर्शनांमुळे एअरपोर्ट्स बंद असून काठमांडूच्या तारिभुवन विमानतळावर सुमारे 400 भारतीय अडकल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली, त्यानंतर सर्व विमानतळंही बंद केली. ज्यामुळे प्रवासी अडकले असून ते नाराज आहेत. अनेक लोकांनी त्यांना होणाऱ्या त्रासाचे वर्णन करणारा व्हिडिओ मेसेजही रेकॉर्ड करून शेअर केला आहे. इमिग्रेशन पूर्ण केल्यानंतरही विमान कंपन्यांनी त्यांना विमानतळावर सोडले आणि विमान कर्मचारी पळून गेले, प्रवाशांना मदत करण्यासाठी कोणीही उपस्थित नाही अशी तक्रार अनेक प्रवाशांनी केली आहे. बाहेर गोंधळ असल्याने विमानतळावर अडकलेल्या भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
फ्लाइट स्टाफ मध्येच पळून गेला
इमिग्रेशननंतर, फ्लाइट रद्द झाल्यामुळे फ्लाइट कर्मचाऱ्यांनी त्यांना परत जाण्यास सांगितले असे प्रवाशांनी सांगितले. पण कुठे जायचे ते कोणीच सांगितलं नाही. बाहेरील परिस्थिती बिघडल्यामुळे प्रवाशांनी विमानतळ सोडण्यास नकार दिल्यावर, कर्मचारी त्या प्रवाशांना तिथेच सोडून तेथून निघून गेले. त्यांना मदत करण्यासाठी तिथे कोणीच नाही, त्यांनी कुठे जावे ते कळत नाहीये असे प्रवाशांचे म्हणणे आहे. भारतीय दूतावासाने आपत्कालीन क्रमांक जारी केले असले तरी, विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना भारतात आणण्यासाठी अद्याप कोणतीही व्यवस्था केलेली नाही.
भारत सरकारने जारी केली ॲडव्हायजरी
नेपाळमध्ये सुरू असलेल्या या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने नेपाळबाबत ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली आहे. भारतीय नागरिकांना सध्या नेपाळचा प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एअर इंडियाने काठमांडूला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत.