नाशिक: आंबे (ता. पेठ) ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास ग्रामपंचायत विभागाकडून होत असलेली टाळाटाळ थांबवावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गेल्या आठवड्यातच ग्रामपंचायत विभागाला तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संताप उफाळून आला.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, आंबे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारप्रकरणी सरपंच व ग्रामसेवक दोषी आढळल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार कारवाई होणे अपेक्षित होते; परंतु ग्रामपंचायत विभागाने केवळ औपचारिक कागदपत्रे पूर्ण करत कारवाई लांबणीवर टाकली. सरपंचांच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे कलम ३९(१) अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली असली, तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
गत आठवड्यात ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत मंत्री झिरवाळ यांना याबाबत साकडे घातले होते. त्यावेळी झिरवाळ संतप्त होत विभागप्रमुखांना थेट फोन करून, “काम करणे शक्य नसेल तर लोकांना खोटी आश्वासने देऊ नका,” अशा शब्दांत खडेबोल सुनावले होते. सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत पवार यांनी अहवाल मागविल्यानंतर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, आठवडा उलटूनही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी सोमवारी (ता.८) पासून आंदोलनाचा मार्ग अवलंबला.
या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य नामदेव गायकवाड, गणपत गायकवाड, रामदास चौधरी, काशिनाथ गायकवाड, पुंडलिक गायकवाड, जयराम जाधव, तानाजी भसरे, देविदास चौधरी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
उपराष्ट्रपती निवडणुकीत NDAचे अचानक ११ मतदार वाढले, मोठ्या पक्षाचा पाठिंबा; काँग्रेस म्हणते, विश्वासघातगटविकास अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागविला होता. हा अहवाल शनिवारी ग्रामपंचायत विभागाला प्राप्त झाला. त्याचे वाचन करून नियमानुसार तातडीने कारवाई करण्यात येईल.
-प्रशांत पवार, सहायक गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विभाग