मुलींमध्ये अव्वल आली… जिल्हाधिकारी बनण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, 10 दिवस मृत्यूशी झुंज, अश्विनीच्या अचानक जाण्याने हळहळ
Tv9 Marathi September 10, 2025 06:45 AM

MPSC स्पर्धा परिक्षेतून मेहनतीने पुढे आलेल्या आणि जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अश्विनी केदारी हिचा अकाली दुर्देवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या पुण्याच्या खेड तालुक्यातील पाळू गावातील रहिवासी असलेल्या अश्विनी केदारी हिच्यावर गेल्या १० दिवसांपासून पिंपरी- चिंचवड येथील डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचार सुरु होते. तिच्यावरील उपचारासाठी विद्यार्थ्यांनी पैसे देखील जमा केले होते. परंतू मृत्यूशी तिची सुरु असलेली झुंज अखेर संपली…

२०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमध्ये पहिली आलेल्या अश्विनी केदारी हिला जिल्हाधिकारी बनायचं होते. २९ ऑगस्टच्या पहाटे घरातील गिझरचे उकळलेले पाणी अंगावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तब्बल दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तिचा लढा संपला आहे.

केवल ३० वर्षांच्या असलेल्या अश्विनी हीने जगातून निरोप घेतला आहे. हा दुर्घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. २९ ऑगस्टच्या पहाटे अभ्यासासाठी लवकर उठली होती. तिने अंघोळीसाठी बादलीत हिटर लावून पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. त्यानंतर तिला डोळा लागला. जेव्हा ती झोपेतून उठली तेव्हा पाणी खूपच गरम झाले होते.तिने हिटर बंद करुन बादली उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा अचानक पाय घसरुन ती पडली आणि गरम उकळलेले पाणी तिच्या अंगावर पडले. हा अपघातात ती ८० टक्के भाजली. तिला गंभीर अवस्थेत पिंपरी-चिंचवड येथील डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल केले. तिच्यावरील उपचार महाग असल्याने सामाजिक संघटनांना मदतीचे आवाहन केले. त्यानंतर लोकांनी सहकार्य देखील केले परंतू तिला उपचार सुरु असतानाच तिचे दुर्देवी निधन झाले.

जिल्हाधिकारी व्हायचं  होतं स्वप्नं

अश्विनी केदारी हिने २०१९ मध्ये बीई ( मॅकेनिकल ) उत्तीर्ण केले होते. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली. तिने युपीएससीची तयारी केली होती. परंतू प्लान बी अंतर्गत तिने एमपीएससीची संयुक्त परीक्षा दिली. साल २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेत तिची निवड झाली नाही. परंतू तिने हार मानली नाही. त्यानंतर साल २०२३ च्या एमपीएससी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत ती महिलांमधून प्रथम आली. तिला कलेक्टर व्हायचे स्वप्न तिने उराशी बाळगलं होते. परंतू नियतीला काही औरच मंजूर होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.