पुण्याचे पर्यटन होणार अधिक रंगतदार!
esakal September 10, 2025 10:45 PM

पुणे, ता. १० : जिल्ह्यात ‘इको टुरिझम’ला प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सुमारे १५ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्याठिकाणी विविध मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ६० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. प्रथमच अशा प्रकारे नियोजन करून पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात ३०० हून अधिक पर्यटनाची ठिकाणी आहे. यामध्ये प्रामुख्याने पावसाळ्यात धबधबे, घाट पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. भोर, राजगड, मुळशी, खेड, जुन्नर आणि मावळ तालुक्यामध्ये पावसाळी पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. मुळशीतील ताम्हिणी घाट, अंधारबन या ठिकाणी पावसाळ्यात भेट देणाऱ्यांची संख्या काही हजारांच्या आसपास असते. परंतु तेथे येणाऱ्या पर्यटकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या ठिकाणी मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. यांसह अष्टविनायक क्षेत्रापैकी एक असलेले मयुरेश्वर मंदिर तसेच राजगड किल्ला, जंगल सफारीचे ठिकाण असलेले कडबनवाडी, तसेच प्रसिद्ध भाजे लेणी या सुमारे १५ ठिकाणी कामे करण्यास पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिले आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

‘इको टुरिझम’साठी ठिकाणांची निवड करताना वन्यजीव असलेली अभयारण्य, धबधबे, किल्ले, लेणी अशा सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. या सर्व ठिकाणी पर्यावरणपूरक विकासकामे करणार आहे.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी


काय होणार...
१) जिल्ह्यातील धबधबे, किल्ले, लेणी आणि अभयारण्ये यांचा इको-टुरिझमसाठी समावेश
२) पर्यटनास चालना देतानाच स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार
३) तिकीट काउंटर, स्वच्छतागृहे, बसण्याची सोय, चेंजिंग रूम आदी सुविधा उभारल्या जाणार
४) डिसेंबरपूर्वी प्रत्यक्ष कामे सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस

येथे होणार इको टुरिझम
राजगड, रायरेश्वर, तिकोना, भाजे, कडबनवाडी, नाणेघाट, ताम्हिणी, मिल्कीबार धबधबा, भामचंद्र डोंगर, राजपूर, मयुरेश्वर, पवना, कामशेत, अंबोली व कुंडेश्वर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.