आखरी रात या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर आराधना सिनेमाने त्यांना थेट सुपरस्टारपद मिळवलं.
शर्मिला टागोरसोबतच्या आराधना आणि नंतरचा आनंद हा त्यांचा अभिनय कौतुकास पात्र ठरलेला सिनेमा ठरला.
त्यांच्या एका वाईट सवयीमुळे त्यांना दिग्दर्शकाच्या पाया पडून माफी मागावी लागली होती.
Bollywood News : बॉलिवूडमधील पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे राजेश खन्ना. राजेश खन्ना यांनी जवळपास एक दशक बॉलिवूडवर राज्य केलं. आजही त्यांच्या अभिनय शैलीचे अनेक चाहते आहेत. काका या नावाने राजेश खन्ना बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होते. 18 जुलै 2012 ला राजेश खन्ना यांचं निधन झालं. जाणून घेऊया त्यांच्याविषयीचा फारसा ऐकिवात नसलेला किस्सा.
आखरी रात या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या राजेश खन्ना यांना सुपरस्टारपद मिळालं ते आराधना या सिनेमामुळे. शर्मिला टागोर आणि त्यांची मुख्य भूमिका विशेष म्हणजे दुहेरी भूमिका असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या सिनेमातील त्यांचा अभिनय गाजला आणि रातोरात ते सुपरस्टार झाले. त्यानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. पण त्यांचा एक खूप गाजलेला आणि तितकाच कौतुकास पात्र ठरलेला सिनेमा म्हणजे आनंद.
आयुष्याचा फक्त काही काळच शिल्लक असलेल्या आनंद नावाच्या हसमुख कॅन्सरग्रस्त पेशंटची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळाली. हृषीकेश मुखर्जी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हृषीदां सोबत हा सिनेमा करायला मिळावा म्हणून राजेश खन्ना बराच काळ प्रयत्न करत होते आणि अखेर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं.
ज्येष्ठ पत्रकार अनिता पाध्ये यांनी या सिनेमाविषयीचा किस्सा त्यांच्या युट्युब चॅनेलवर सांगितला. हा किस्सा सांगताना त्या म्हणतात की, हृषि दांना राजेश खन्ना यांची सेटवर उशिरा जायची सवय माहित होती. त्यांना ते आवडत नव्हतं त्यामुळे त्यांनी आधीच सांगितलं की, तू सेटवर वेळेवर आलं पाहिजेस. त्यांनी आठचा कॉल टाइम राजेश खन्ना यांना दिला होता. तर इतर कास्ट सात वाजता यायची. हृषि दांबरोबर काम करण्यासाठी उत्सुक असलेल्या राजेश खन्ना यांनी सुरुवातीला या अटीसाठी होकार दिला.
सुरुवातीचे दोन-तीन दिवस राजेश खन्ना सेटवर वेळेत आले. शूटिंग नीट सुरुही झालं. त्यानंतर दोन-तीन वेळेला असं झालं की राजेश खन्ना सेटवर उशिरा पोहोचले. सगळे सीन त्यांचेच असल्यामुळे इतर कास्टला त्यांची वाट बघत थांबून राहावं लागायचं. त्यामुळे हृषि दा एक दिवस खूप चिडले आणि त्यांनी राजेश खन्ना यांना सिनेमाचं शूट बंद करण्याची धमकी दिली. राजेश खन्ना यांनी त्यांना वचन दिलं की ते सेटवर वेळेत पोहोचतील.
दुसऱ्या दिवशी त्यांना आठ चा कॉल टाईम देण्यात आला. सगळेजण सेटवर वेळेत हजर होते पण राजेश खन्ना आठ वाजले तरीही आले नव्हते. हृषि दा यांनी अजून अर्धा तास वाट पाहायची ठरवली. तरीही ते पोहोचले नव्हते. शेवटी त्यांनी राजेश खन्ना यांच्या घरी फोन केला तेव्हा ते घरातून केव्हाच निघाले असल्याचं समजलं. त्यामुळे हृषिकेश यांनी अजून काही वेळ वाट पाहायची ठरवली. पण एक दोन तास होऊनही ते सेटवर न आल्याने हृषि दा चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी सेटवरील काही माणसांना हायवेवर राजेश खन्ना यांच्या शोधात पाठवलं.
सगळेजण सेटच्या बाहेर खुर्च्या टाकून राजेश खन्ना यांची वाट पाहत होते तेव्हाच राजेश खन्ना सेटवर आले. सेटवरील वातावरण गंभीर आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मुद्दाम "अरे हा दिग्दर्शकच असा सिनेमाचं शूटिंग सोडून बाहेर बसला तर सिनेमा कसा तयार होणार " असं ते मस्करीत बोलले. हृषि दा आधीच चिडले होते. त्यांनी राजेश खन्ना यांना "हरामखोर" असं म्हणत शिवी घातली आणि त्यानंतर त्यांनी सिनेमाचं पॅकअप झाल्याचं जाहीर केलं. हा सिनेमा बनणार नाही तुम्ही घरी जा असं सगळ्यांना सांगितलं. काही लोक निघून गेले. त्यांनी प्रॉडक्शन मॅनेजरलाही "निर्मात्यांना हा सिनेमा बंद झाल्याचं सांगा मी त्यांना नंतर येऊन भेटतो" असं सांगितलं.
त्यानंतर राजेश खन्ना मेकअप रूममध्ये असलेल्या रमेश देव यांना भेटले. तेव्हा रमेश देव यांनी हृषि दा आधीच तुमच्यामुळे चिंतेत असल्याचं सांगितलं आणि सेटवर घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे राजेश खन्ना यांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी हृषि दा यांची प्रत्यक्षात माफी मागण्याचा निर्णय घेतला आणि सोबत रमेश यांना येण्याची विनंती केली. ठरल्याप्रमाणे रमेश आधी हृषि दांच्या घरी गेले. सुरुवातीला त्यांनी गप्पा मारल्या. मग राजेश खन्ना तिथे आले आणि त्यांनी हृषि दांना अक्षरशः साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी त्यांना सांगितलं की,"तुम्ही हा सिनेमा बंद करू नका. मी तुमच्या पाया पडतो. मी उद्यापासून वेळेत येईल."
हृषि दांचा रागही शांत झाला होता. त्यांनी त्यांना माफ केलं. त्यानंतर राजेश यांनी त्यांना वेळेत सेटवर येण्याचा शब्द दिला. दिलेल्या शब्दाप्रमाणे राजेश खन्ना वेळेवर सेटवर येऊ लागले आणि सिनेमाचं शूटिंग व्यवस्थित पार पडलं. हा सिनेमाही सुपरहिट झाला.
FAQs :
1. राजेश खन्ना यांना बॉलिवूडमध्ये पहिले सुपरस्टार का म्हटलं जातं?
कारण त्यांनी जवळपास एक दशक हिंदी सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवलं आणि सलग सुपरहिट चित्रपट दिले.
2. त्यांचा पहिला चित्रपट कोणता होता?
आखरी रात (1966).
3. त्यांना सुपरस्टारपद कोणत्या चित्रपटामुळे मिळालं?
आराधना (1969).
4. राजेश खन्ना यांच्या सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांमध्ये कोणते नाव घेतले जाते?
आराधना, आनंद, कटी पतंग, अमर प्रेम इत्यादी.
5. त्यांना दिग्दर्शकाची माफी का मागावी लागली होती?
त्यांच्या वाईट सवयीमुळे ज्यामुळे निर्माते-दिग्दर्शक त्रस्त होत असत.