काळेवाडी, ता.१० : काळेवाडीमधील विविध भागांत अपुरा पाणीपुरवठा होत असून दिवसातून सातत्याने दोन ते तीन वेळेस वीजपुरवठा खंडित होत असून तास न तास वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. या दुहेरी त्रासामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. तसेच विजेवर अवलंबून असणाऱ्या उद्योग-व्यावसायिकांनाही त्यामुळे आर्थिक फटका बसत
आहे.
अनेक महिन्यांपासून काळेवाडी परिसरातील विजयनगर, तापकीरनगर व बहुतांश भागांत वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत आहेत. त्यामुळे वेळेवर वीजबिल भरणाऱ्या व प्रामाणिक वीज ग्राहकांना त्याचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली आहे. तर महावितरणच्या कार्यालयात नागरिकांनी तक्रारींसाठी फोन केल्यास फोन उचलला जात नाही तसेच महावितरण विभागाचे कर्मचारी हे ही बऱ्याच वेळा फोन उचलत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वीज बिल भरण्यासाठी महावितरण कंपनीकडून ग्राहकांवर वेळेत पैसे भरण्यासाठी दबाव आणला जातो. तसेच वेळेत बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जातो. शिवाय दंड सुद्धा काही वेळा आकारण्यात येत असतो. मात्र, ज्यावेळेस शाश्वत आणि खात्रीशीर वीजपुरवठ्याची वेळ येते. तेव्हा, मात्र महावितरण कंपनी सेवा देण्यास कमी पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, नागरिकांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे.
सतत होणारा खंडित विजेचा त्रास हा मोठा असून त्यामुळे दैनंदिन कामे होत नाहीत. मुलांचा अभ्यास व घरातील अनेक कामे वेळेत न झाल्याने त्रास होत आहे. विशिष्ट भागात जर ही समस्या असेल; तर या भागात नवीन वीज केंद्र किंवा फिडर वाढवावे. त्यामुळे, नागरिकांना सोयीचे होईल.
- मेघा दाभाडे, रहिवासी
माझा ऑनलाइन ‘आपले सरकार पोर्टल’ वर ई - सुविधा व्यवसाय असून महत्वाची कागदपत्रे व दाखले देण्याचे काम चालते. त्यासाठी आम्ही पूर्णपणे विजेवर अवलंबून आहोत. पण, वीज पुरवठा वारंवार खंडित होण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
- प्रशांत बोरवके, व्यावसायिक, काळेवाडी
काळेवाडी परिसरामध्ये विविध ठिकाणी नागरिक पाण्याच्या वेळी अतिरिक्त पाणी ओढण्यासाठी मोटर व पंपाचा उपयोग करून वीज भार वाढत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनेक ठिकाणी त्याबाबत काम हाती घेण्यात आले आहे. त्या संदर्भात विविध ठिकाणी कर्मचारी नेमले आहेत. नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.
- शीतल मेश्राम, सहाय्यक अभियंता, महावितरण विभाग, काळेवाडी
कमी दाबाने पाणीपुरवठा
काळेवाडी, रहाटणीमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाण्याचे पंप मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. त्यामुळेही वीज पुरवठ्यावर ताण पडत आहे. लोकसंख्या व त्यातुलनेतील वीजपुरवठा यासाठी महावितरणकडून अतिरिक्त भार सहन करू शकेल असे फिडर किंवा उपकेंद्र ही वाढविण्याची नागरिकांची मागणी आहे. त्याने वीजपुरवठ्यावरील ताण कमी होऊन व सतत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल.
काळेवाडीत तक्रार निवारण व्हावे
महावितरणचे तक्रार निवारण व संपर्क कार्यालय आता बिजलीनगर येथे स्थलांतरित केल्याने नागरिकांना एका वेगळ्याच मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील कोणत्याही तक्रारींसाठी महावितरणच्या बिजलीनगर येथील नवीन कार्यालयात संपर्क साधावा लागत असून परिसरातील तक्रारी वाढल्याने महावितरण विभागानेही याच परिसरात संपर्क कार्यालय पुन्हा सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे