विमानतळाला सुरक्षेचे कवच
नवी मुंबई पोलिसांकडून विशेष पथकाची नियुक्ती
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरक्षा, प्रशासनिक तयारी वेगाने सुरू आहे. विमानतळावर स्वतंत्र पोलिस ठाणे, वाहतूक नियंत्रण व्यवस्था तसेच प्रवाशांच्या व्हिसा तपासणीसाठी विशेष पोलिसांची नियुक्तीमुळे परिसरासह प्रवाशांना सुरक्षाकवच निर्माण होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा उभारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रवाशांच्या हालचाली व्यवस्थित पार पाडल्या जातील, याची खबरदारी नवी मुंबई पोलिसांकडून घेतली जाणार आहे. तसेच या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठीचे नियोजनही केले जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण होणार असल्याने सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
-----------------------------------------
उलवे पोलिस ठाण्यावर जबाबदारी
विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तैनात केली जाणार आहेत. जोपर्यंत विमानतळ पोलिस ठाण्याला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत गुन्हेगारी प्रकरण घडल्यास उलवे पोलिस ठाण्यावर त्याची जबाबदारी राहणार आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी तयारी केली आहे. विमानतळ परिसरातील सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, प्रवासी व्हिसा तपासणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
-----------------------------------
प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे
विमानतळ पोलिस ठाण्याचा प्रस्ताव गृहमंत्रालयाच्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी २१६ कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. हे पोलिस ठाणे विमानतळाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग म्हणून उभारले जाणार असून, मंजुरी मिळताच तातडीने हे पोलिस ठाणे कार्यान्वित होणार आहे. विमानतळावरून प्रवाशांच्या व्हिसा तपासणीसाठी २८५ पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यात ७५ पोलिस अधिकारी आणि २१० हवालदार आहेत. यासाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर काही अधिकाऱ्यांची नियुक्ती गृह विभागाने केली आहे.
----------------------------------
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरक्षा आणि प्रशासनाची तयारी सुरू असून विमानतळावर स्वतंत्र पोलिस ठाणे, वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि प्रवाशांच्या व्हिसा तपासणीसाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सर्व तयारीमुळे विमानतळावरील प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत सेवा मिळणार आहे. विमानतळ परिसरात सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
- संजयकुमार पाटील, पोलिस उपआयुक्त (मुख्यालय)
------------------------------
व्हिसा तपासणीसाठी - २८५ पोलिस
पोलिस अधिकारी - ७५
हवालदार - २१०