Sangli Killing Case : 'तू आमच्या मिरवणुकीत नाचू नकोस,' लाथा बुक्यांनी मारताना आडवायला गेलेल्यालाच भोसकलं; २५ वर्षीय शीतलचा मृत्यू, सांगलीत मोठा तणाव
esakal September 11, 2025 02:45 PM

Sangli Crime News : अंकली (ता. मिरज) येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत भोसकल्याने गंभीर जखमी झालेल्या शीतल धनपाल पाटील (वय २५) तरुणाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आज सकाळी गावात आणण्यात आला. त्यावेळी कुटुंबियांसह गावकरी आक्रमक झाले. त्यांनी स्मशानभूमीत नेलेला मृतदेह परत गावात आणून संशयित हल्लेखोरांच्या दारात नेऊन ठेवला. जोवर संशयितांची गावातून धिंड काढली जात नाही, तोवर अंत्यसंस्कार होणार नाहीत, अशी भूमिका घेतली. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी शीतलचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी हंबरडा फोडला. ते पाहून गावकऱ्यांनाही हुंदका आवरता आला नाही. आज अंकली गाव बंद ठेवत निषेध व्यक्त करण्यात आला. काही लोकांमुळे गाव बदनाम होत असून, त्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. दरम्यान, गावात कोठेही कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की शनिवारी (ता. ६) रात्री अंकली येथील जैन बस्तीजवळ गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. रात्री दहाच्या सुमारास संशयित विकास बंडू घळगे (वय ३५) हा मिरवणुकीत घुसून नाचू लागला. तेव्हा मंडळाचे सदस्य सुनील पाटील यांनी त्याला अडवले. ‘तू आमच्या मिरवणुकीत नाचू नकोस,’ असे त्याला सांगितल्यावर त्याने सुनील पाटील यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पाटील यांचा पुतण्या जखमी शीतल हा भांडण सोडवण्यास गेला.

त्यावेळी विकासचे साथीदार क्षितिज ऊर्फ आप्पा शशिकांत कांबळे (वय २८), आदित्य शंकर घळगे (वय २२, अंकली) हे दोघे त्याठिकाणी आले. त्यांनी सुनील पाटील यांना मारण्यास सुरुवात केली. यावेळी शीतल भांडण सोडविण्यासाठी आला, तेव्हा संशयितांनी त्याला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना काल (ता. ८) शीतल याचा मृत्यू झाला.

दरम्यान, शीतल याचा मृतदेह आज गावात आणण्यात आला. त्यावेळी कुटुंबियांनी हंबरडा फोडला. अख्खे गाव यावेळी एकत्र आले होते. शीतल याचा मृतदेह स्मशानभूमीत नेल्यानंतर गोंधळ झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी तो मृतदेह पुन्हा गावात आणला. संशयित हल्लेखोरांच्या घरासमोर ठेवला. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. पोलिस निरीक्षक किरण चौगले यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी संशयितांची दहशत मोडून काढण्यासाठी गावात धिंड काढा, अशी मागणी करण्यात आली. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगत मध्यस्थी केली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला व मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गाव बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे गावात शंभर टक्के शुकशुकाट होता. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने अख्खे गाव सुन्न झाले आहे.

Sangli Crime: 'शेगावमध्ये घरफोडीत ४ लाखांचे सोने पळविले'; जत पोलिसांत गुन्हा, शोधासाठी पथक रवाना

स्मशानात नेलेला मृतदेह संशयित हल्लेखोरांच्या घरासमोर ठेवण्याची वेळ अंकलीतील गावकऱ्यांवर आली, या सारखे दुर्दैव नाही. गावात सारे समाज गुण्यागोविंदाने राहात आहेत. काही समाजकंटकांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा अंकली ग्रामस्थांकडून निषेध केला जात आहे.

- शशिकांत पाटील, माजी सरपंच, अंकली

अंकलीत मिरवणुकीदरम्यान घडलेल्या घटनेमुळे जनक्षोभ उसळला होता. संशयितांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे पोलिसांनी संशयितांना तत्काळ अटक केली आहे. त्यांना कडक शिक्षा व्हावी, असा तपास केला जाईल. सद्य:स्थितीत गावात शांततेचे वातावरण आहे.

- किरण चौगले, पोलिस निरीक्षक, ग्रामीण पोलिस ठाणे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.