पुणे, ता. १३ : ईशान्या फाउंडेशन व नाबार्ड यांच्यातर्फे १८ वा ‘यलो रिबन एनजीओ फेअर-ग्रामीण भारत महोत्सव’ हा १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान येरवडा येथील क्रिएटिसिटी येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन स्वदेश फाउंडेशनच्या झरिना स्क्रूवाला, ईशान्या फाउंडेशनच्या पारुल मेहता व नाबार्डच्या सीजीएम रश्मी दराड यांच्या उपस्थितीत होणार आहे.
‘एक्सप्लोर, एम्ब्रेस, इव्हॉल्व’ या संकल्पनेवर आधारित या फेअरमध्ये २० राज्यांतील कारागीर, शेतकरी, विणकर व स्वयंसेवी संस्था सहभागी होणार असून, तीन हजारांहून अधिक हस्तनिर्मित व शाश्वत उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील. यात वस्त्र, सेंद्रिय अन्नधान्य, पर्यावरणपूरक भांडी, सजावटीच्या वस्तू तसेच मराठमोळे खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे.
‘‘खरेदीसोबतच कारागिरांशी संवाद, मुलांसाठी प्ले झोन, तासागणिक लकी ड्रॉ व थेट खाद्यकाउंटर यामुळे हा उत्सव संपूर्ण कुटुंबासाठी अनुभवमय ठरणार आहे. हा फेअर म्हणजे उपजीविका, परंपरा व शाश्वततेचा उत्सव आहे, येथील प्रत्येक खरेदी महिलांना सशक्त करते, शेती व विणकाम समुदायांना आधार देते, ’’ असे पारुल मेहता यांनी सांगितले.