91216
गाव विकासाचे काटेकोर नियोजन करा
जयप्रकाश परब ः कुडाळात ‘समृद्ध पंचायत राज’ कार्यशाळेस प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानातून प्रत्येक गावाचे बजेट तयार करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बारकाईने नियोजन करणे गरजेचे आहे. सरपंच म्हणून गावाचा विकास ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे जे काम कराल, ते कागदावर उतरले पाहिजे, अशा सूचना पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी दिल्या. दशावतार लोककला सादरीकरणातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती (कुडाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महालक्ष्मी सभागृहात ग्रामविकास व पंचायतराज विभागअंतर्गत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ तालुकास्तरीय कार्यशाळा झाली. तहसीलदार वीरसिंग वसावे, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, प्रशिक्षक प्रसन्नता चव्हाण (यशदा मास्टर संस्था पुणे), सहाय्यक परिक्षाधीन गटविकास अधिकारी स्नेहा माने, पंचायत विस्तार अधिकारी संजय ओरोसकर व गजानन धरणे, लघू पाटबंधारे विभागाचे मंगेश हवालदार, सुनील प्रभू, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे श्री. गवस आदी उपस्थित होते. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्षक विभागातर्फे दशावतार नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
श्री. परब म्हणाले, ‘शासनाच्या अनेक योजना असतात. त्याचा सुयोग्य उपयोग करून घेतला पाहिजे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील लोकांनी मोठ्या प्रमाणात मनरेगा योजनेचा फायदा घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेबाबत प्रबोधन झाले नाही. अडीच महिन्यात या अभियानाचे काम पूर्ण करायचे आहे.’ त्यासाठी तुम्ही जागृत डॉ. देवधर यांनी, सध्या शिक्षणामुळे गावे रिकामी होण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनाच्या या अभियानाचा फायदा गावाच्या विकासासाठी करून घेतला पाहिजे. ग्रामसेवक म्हणून झपाट्याने कामे करा, असे आवाहन केले. श्री. वालावलकर यांनी, सर्वांनी या संधीचा फायदा करून घ्यावा. या अभियानाचे काम जोराने करून हे अभियान यशस्वी करूया, असे सांगून आभार मानले.