Earthquake in India: ईशान्य भारतात 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, नागरिक भयभीत
Tv9 Marathi September 15, 2025 01:45 AM

काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये शक्तिशाली भूकंप झाला होता. यात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला होता. अशातच आता ईशान्य भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आसाममधील उदलगुरीसह आसपासच्या भागात 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र आसाममधील उदलगुरी येथे होते. तसेच या भूकंपाची खोली 5 किलोमीटर होती अशी माहितीही समोर आली आहे.

4 वाजून 41 मिनिटांनी भूकंप

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या भूकंपाची माहिती दिली आहे. एनसीएसच्या मते आय दुपारी 4 वाजून 41 मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक लोकांनी भूकंपानंतर घराबाहेर धाव घेतली. या भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. सध्या प्रशासनाकडून भूकंपाबाबत सविस्तर आढावा घेतला जात आहे.

EQ of M: 5.8, On: 14/09/2025 16:41:50 IST, Lat: 26.78 N, Long: 92.33 E, Depth: 5 Km, Location: Udalguri, Assam.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/fGgMfM05Lb

— National Center for Seismology (@NCS_Earthquake)

इतरही राज्यांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र आसाममधील उदलगुरी जिल्ह्यात होते. मात्र या भूकंपाचे धक्के आसामसह मेघालय, नागालँड आणि मणिपूर सारख्या ईशान्येकडील इतर जाणवले. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आता प्रशासनाने लोकांना अफवांकडे लक्ष न देण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

आसाममधील उदलगुरी हे या भूकंपाचे केंद्रबिंदु होते, त्यामुळे या ठिकाणी जोरदार धक्के जाणवले. त्याचबरोबर बंगाल आणि भूतानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र या भूकंपात आतापर्यंत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

याआधीही जाणवले होते भूकंपाचे धक्के

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आसाममधील सोनितपूर येथे 3.2 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. आसाम राज्यातील हा भाग भूकंप संवेदनशील क्षेत्रात येतो. हा भाग पूर्व हिमालयीन पर्वतरांगांमध्ये युरेशियन आणि सुंदा प्लेट्स यांच्याती टक्कर होणाऱ्या बिंदूवर स्थित आहे. त्यामुळे या भागाला भूकंपाचा मोठा धोका आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.