पनवेल, उरण कचरामुक्त
esakal September 15, 2025 03:45 AM

पनवेल, उरण कचरामुक्त
सिडको वीजप्रकल्प राबवणार; एक हजार कोटींची तरतूद
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ ः तळोजा औद्योगिक वसाहतीत कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. सिडको महामंडळाने यासाठी एक हजार कोटींचा कचरा प्रकल्प उभारण्यात येत असून पनवेल महापालिका, विस्तारलेली दक्षिण नवी मुंबई, उरण नगर परिषदेतील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सिडकोने नवी मुंबई शहराची निर्मिती केली. या परिसरात वाढते शहरीकरण असलेल्या नवी मुंबई, पनवेल पालिका कार्यरत आहेत. नवी मुंबई पालिकेने तुर्भे येथे अद्ययावत आणि शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रकल्प उभारला; मात्र पनवेल पालिकेसमोर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न उभा आहे. महापालिकेची आर्थिक क्षमता नसल्याने सध्या पनवेल महापालिकेचा कचरा प्रश्न सिडकोमार्फत सोडवला जात आहे. पनवेलप्रमाणे उरण नगर परिषदेच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी सिडकोवर आहे. त्याबदल्यात दोन्ही संस्था सिडकोला खर्च देत आहेत; मात्र वाढती लोकसंख्या, नागरीकरणातून भविष्यात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हाने सिडकोसमोर आहे.
-------------------------------------
प्रकल्पाचे फायदे
- तळोजा येथे सिडकोच्या कचरा क्षेपणभूमीवर वीजनिर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. सद्यःस्थितीत निर्माण होणाऱ्या कचऱ्यापेक्षा दुप्पट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात पनवेल महापालिकेची आर्थिक भागीदारी असणार आहे. उरण नगर परिषदेतून येणारा कचऱ्यावरही प्रक्रिया होणार आहे.
- तळोजा येथील प्रकल्पात ७५० मेट्रिक टन कचरा दैनंदिन स्वरूपात गोळा होत आहे. पनवेल, उरण आणि सिडको हद्दीतील कचऱ्याला या प्रकल्पात गोळा करून त्यावर निर्माण होणारी वीज सिडकोच्या विविध कॅप्टिव्ह ऊर्जा वापरणाऱ्या प्रकल्पांसाठी वापरले जाईल.
- प्रकल्पामुळे पनवेल आणि जवळच्या परिसरातील रहिवासी वसाहतींमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न किमान २५ वर्षे सुटणार आहे.
-----------------------------------------
वीजपुरवठा करणार
- नवी मुंबई मेट्रो प्रकल्प
- मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र
- जलशुद्धीकरण केंद्र
- पंपिंग स्टेशन (सांडपाणी आणि घरगुती पाणी)
----------------------------------------------
असा आहे हा प्रकल्प
तळोजा येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पावर एक हजार ८४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे खासगी भागीदारीतून उभारला जाणार आहे. तळोज्यातील चाळ गावाजवळ २२ एकरात हा प्रकल्प तयार केला जात आहे. १,५०० मेट्रिक टन इतक्या किलो कचऱ्याचे नियोजन आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करून २७ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाणार आहे.
-------------------------------------------------
वाढत्या नवी मुंबईचा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सिडकोने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या प्रकल्पामुळे पनवेल, उरण भागातील कचऱ्याचा प्रश्न सुटेल. तसेच वीज प्रकल्पांमुळे परिसरातील प्रकल्पांना वीजपुरवठा होणार आहे.
- प्रिया रातांबे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको
़़़़़़़़ः-----------------------------------
प्रकल्पावरील खर्च - एक हजार ८४ कोटी
ठिकाण - तळोज्यातील चाळ गाव
जागा - २२ एकर
कचरा - १,५०० मेट्रिक टन
वीज - २७ मेगावॉट

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.