तळेगाव दाभाडे, ता. १४ : महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक पोलिसांना हवा असलेला आंतरराज्य टोळीचा म्होरक्या बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार (रा. हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी कर्नाटकातील कलबुर्गी येथे पकडले. गेली दोन वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता.
बेताब याच्यावर अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण, मारहाण, अत्याचार, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये लोणावळ्यात बेताब यांच्या टोळीने विविध गुन्हे केले. त्यानंतर पोलिसांनी या टोळीतील राज सिद्धेश्वर शिंदे व ज्ञानेश्वर लोकरे यांना अटक केली होती. त्यानंतर बेताब फरार होता. त्याच्यावर गुजरातमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. तर, साबरमती कारागृहातून तात्पुरत्या जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतरही त्याची दुष्कृत्ये सुरूच होती. त्याच्यावर कर्नाटकमध्येही गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी कसून शोध घेऊन अखेर त्याला जेरबंद केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे, पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, प्रकाश वाघमारे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.