दापोडी रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर रोज अंधारात
esakal September 15, 2025 07:45 AM

जुनी सांगवी, ता.१४ ः गेल्या काही दिवसांपासून दापोडी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराबाहेरील मुख्य रस्ता, वाहनतळाजवळील पथदिवे बंद पडल्याने दररोज संपूर्ण परिसर अंधारात बुडत आहे. संध्याकाळी व रात्रीच्यावेळी रेल्वे स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना अंधारातच मार्ग काढावा लागत असून गुन्हेगारी घटनाही घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दापोडी रेल्वे स्थानकांवरून दररोज हजारो प्रवासी पुणे व विविध भागात ये जा करण्यासाठी प्रवास करतात. दापोडी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव आदी भागातून या परिसरात प्रवाशांची मोठी ये जा असते. या सर्वांना सुरक्षित व प्रकाशमान वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना धोका पत्करून ये-जा करावी लागत आहे. स्थानकाबाहेरील मुख्य रस्ता, वाहनतळ तसेच परिसरातील दिवे बंद पडल्याने रहदारीसाठी प्रवासी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अनेक चाकरमानी मंडळी, महिला प्रवासी, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना येथून येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत व्यवस्थेअभावी स्थानक परिसरात गुन्हेगारी घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे, रेल्वे प्रशासन तसेच महापालिकेने समस्येबाबत तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे स्थानकासमोरच वाहनतळ आहे. तेथे वाहने उभी करुन अनेक चाकरमानी पुणे आणि अन्य परिसरात कामाला जात असतात. परंतु, तेथेही प्रकाश व्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे.

पिण्याच्या पाण्याचा अभाव
रेल्वे स्थानकातील पिण्याचे पाणी कुलर व नळकोंडाळ्याला पाणी नाही. तुंबलेल्या स्वच्छतागृहामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेही प्रवाशांची गैरसोय आहे. याशिवाय, परिसरात भटक्या श्वानांचा वावरही वाढला आहे.
- अंधारामुळे मद्यपींचा वावर, काही मद्यपींकडून परिसरात मद्यपान
- महिला, मुली विद्यार्थी यांना अंधारामधून जावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- नोकरदारवर्गाची वाहनतळावरील अंधारातच वाहनांची शोधाशोध

दापोडी रेल्वे स्थानकाबाहेरील अंधाराचा महिला प्रवाशांनी धसका घेतला आहे. येथील परिसरातील पथदिवे सुरू ताबडतोब सुरू केले जावेत.
- संजय कणसे, स्थानिक नागरिक

येथील परिसरात अंधार असल्याने महिला प्रवासी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री भटक्या श्वानांचा त्रास, मद्यपींचा वावर वाढला आहे.
- मेरी झेवियर, प्रवासी


रेल्वे स्थानकाबाहेरील बंद पथदिव्यांबाबत रेल्वे प्रशासनाकडे तोंडी व लेखी तक्रार देण्यात आली आहे. दिवाबत्ती दुरुस्तीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
- विशाल वाळुंजकर, सदस्य, रेल्वे मंडळ

दापोडी रेल्वे स्थानक परिसराला भेट देऊन महापालिका अखत्यारीतील बंद पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल.
- जितेंद्र अहिरे, अभियंता (विद्युत), ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय,

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.