केशोरी (जि. गोंदिया) : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम नागलडोह हे गाव हत्तींच्या कळपाने दोन वर्षांपूर्वी अर्थात २०२३ मध्ये उद्ध्वस्त केले. त्यामुळे सैरभैर झालेले येथील रहिवासी लगतच्या बोरटोला व तिरखुरी येथे तात्पुरत्या स्वरूपात राहू लागले.
आता याच गावकऱ्यांनी पाच ते सहा महिन्यांपूर्वी नागलडोहपासून जवळपास सात किलोमीटर अंतरावर अतिक्रमित जागेत दहा झोपडीवजा घरे बांधून हत्तीटोला हे नाव दिले. उद्ध्वस्त झालेले नागलडोह आता इतिहासजमा होणार आहे. हत्तीटोल्यात पाणी, विद्युत आणि सिमेंट रस्ता आदी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
शासनाच्या पडीक जागेवर ५० वर्षांपूर्वी नागलडोह हे गाव वसले होते. या गावात आदिवासींची केवळ नऊ घरे होती. ५३ लोकसंख्येच्या या गावात एक विहीर, एक बोअरवेल एवढीच व्यवस्था होती. जंगलात जाऊन मोहफूल वेचणे, डिंक गोळा करणे, बांबू कटाई व टेंभुर्णीची पाने तोडून आलेल्या मिळकतीतून या लोकांचा उदरनिर्वाह सुरू होता. जंगलाला लागून हे गाव असल्याने गावकरी नेहमी वन्यप्राण्यांच्या सांनिध्यात जीवनयापन करीत होते. वनविभागाच्या जमिनीवर ते पीक घेत होते. शिक्षण, दळणवळण, आरोग्याची कुठलीही व्यवस्था नसलेले हे गाव जिल्ह्याच्या नकाश्यातून गायब होते.
मात्र, २०२३ सालच्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आलेल्या हत्तींच्या कळपाने हे गाव प्रकाशझोतात आले. हत्तींच्या कळपाने या गावातील नऊही घरे अक्षरशः उद्ध्वस्त केली. गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे सैरभैर झालेले नागरिक नागलडोह गावातून लगतच्या बोरटोला आणि तिरखुरीत आश्रयाला गेले.
तिथे समाजमंदिरे आणि काही तात्पुरत्या स्वरूपात झोपड्या बांधून राहू लागले. मध्यंतरी या नागरिकांनी नागलडोहपासून सात किलोमीटर अंतरावर वनविभागाच्या पडीक जागेवर झोपडीवजा घरे बांधली. आता दहा झोपडीवजा घरे उभी झाली. या दहा घरांच्या गावाला हत्तीटोला असे नाव दिले. उद्ध्वस्त नागलडोह हे गाव आता इतिहासजमा होणार आहे. तथापि, नागरिकांनी पुढाकार घेत उभ्या केलेल्या या लोकवस्तीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे यांच्या पुढाकारातून या लोकवस्तीत पाणी, विद्युत आणि सिमेंट रस्ता आदी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
नव्या वस्तीत प्राथमिक सोयी-सुविधा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. नक्षलग्रस्त भागातील निधी, विद्युत विभागाशी संवाद साधून एक सहकार्य म्हणून त्या ठिकाणी विद्युत सेवा, पाण्याची व्यवस्था आणि एक सिमेंट रस्ता तयार करून दिला. आता सुरळीत विद्युत सेवा होण्याच्या दृष्टिकोनातून आणि रहिवाशांना घरकुल मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- श्रीकांत घाटबांधे, जि.प., केशोरी.
पूर्वी आम्ही नागलडोह यथे राहत होतो. परंतु, हत्तींच्या कळपाने सारेच हिरावून घेतले. त्यामुळे तिरखुरी आणि बोरटोला येथे आम्ही राहू लागलो. आता नागलडोहपासून सात किलोमीटर अंतरावर हत्तीटोला नावाची वस्ती तयार केली आहे. प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. परंतु, उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. शासनाने प्रत्येकाला जमीन देऊन आमचा उदरनिर्वाह होईल, अशी व्यवस्था करावी.
- निजाम हलामी, रहिवासी, हत्तीटोला.
Nagpur High Court: समृद्धीवरील स्वच्छतागृहांमध्ये ना पाणी, ना देखभाल; उच्च न्यायालयात याचिकाकर्त्याने सादर केला अहवाल घरकुलांविषयी होणार प्रयत्नअर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी अलीकडेच एक शिष्टमंडळ हत्तीटोल्यात पाठविले होते. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजित पवार) तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, योगेश नाकाडे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या शिष्टमंडळाने तेथील नागरिकांशी चर्चा केली. कायमचे घरकुल कसे मिळतील, याविषयी माहिती गोळा करणे, शासन दरबारी त्यांचा पाठपुरावा करणे आदी कामे या शिष्टमंडळाने केलीत.