चिंचवड, ता. १४ ः पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन मोठे सण उत्साहात व सुरळीत पार पडण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल पोलिस अंमलदारांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
परिमंडळ एक येथील कार्यालयात पिंपरी-चिंचवडचे पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांच्या हस्ते सागर आढारी, योगेश लोहोकरे, अमोल साळुंखे आणि संतोष उभे या अंमलदारांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. गुप्त वार्ता, सर्व्हेलन्स शाखा व ड्युटीवरील अंमलदारांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे मनोबल वाढविणे व प्रोत्साहन देणे हे कार्यक्रमाचे उद्देश होते.
महत्त्वाच्या सणांच्या काळात पोलिस दलाने जबाबदारीने कामगिरी बजावली. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, सुरक्षेची खबरदारी, गोपनीय माहिती जमा करणे तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे यामध्ये पोलिस अंमलदारांनी मोठा वाटा उचलला. या कार्यक्रमाला पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे, चिंचवड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे तसेच अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंमलदारांना मार्गदर्शन केले.
अंमलदारांतर्फे आढारी यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, "आम्ही केलेले प्रयत्न हे समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेसाठी आहेत.यापुढेही अशाच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करत राहू."
--------