पिंपळे गुरव, ता.१४ ः काटेपुरम चौकाजवळील जलतरण तलावाशेजारील मोकळ्या आरक्षित भूखंडाभोवतीच्या सीमाभिंतीचा काही भाग ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाने पाडून टाकल्याने भूखंडावर मोठ्या प्रमाणात बांधकामातील राडारोडा, प्लास्टिक आणि घरगुती कचरा तेथे टाकला जात आहे. याशिवाय सर्रास बेकायदा पार्किंग आणि रात्रीच्यावेळेस वाहनांच्या आड मद्यपींना आश्रय असल्याने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर स्वरूप धारण करत आहे.
काटेपुरम चौकाजवळील जलतरण तलावाशेजारील मोकळ्या आरक्षित भूखंडाभोवती पूर्वी महापालिकेच्या उद्यान स्थापत्य विभागाने सीमाभिंत बांधली होती. मात्र, ‘ह’ प्रभागाच्या स्थापत्य विभागाने गणपती विसर्जनासाठी कृत्रिम हौद तयार करण्याच्या कारणास्तव तिचा काही भाग पाडून टाकला. त्याने भूखंड उघडा राहिल्याने परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता व असुरक्षेचे वातावरण पसरले आहे. बेकायदेशीरपणे वाहन पार्किंग केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाऱ्याचा फलक महापालिकेने उभारलेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन तेथे सर्रास वाहने उभी केली जात आहेत.
माता येडेश्वरी मंदिरालगतच्या भिंतीचे बांधकाम न केल्याने या बाजूने अनधिकृत प्रवेश सुरू आहे. आरक्षित भूखंडाभोवती पुन्हा मजबूत भिंत बांधली गेली, तर हे सर्व गैरप्रकार थांबतील, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
‘‘गणेश विसर्जनासाठी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाने अगोदर बांधलेली सीमाभिंत तोडली असून त्याठिकाणी प्रवेशद्वार लावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूस ही असलेले लोखंडी प्रवेशद्वार गणेशोत्सवासाठी उघडे करण्यात आले होते. मात्र, तोडलेल्या सीमा भिंती संदर्भात पाठपुरावा केला जाईल.”
- विजय जाधव, उपअभियंता, क्रीडा स्थापत्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आरक्षित भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. बेकायदेशीर वाहने पार्क केली जातात. त्यामुळे आरोग्याबरोबर सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
- शीतल शिंदे, स्थानिक गृहिणी
भूखंडाच्या ठिकाणी उभारण्यात आलेला कृत्रिम हौद वापरानंतर बुजविण्यात आलेला असून त्यासाठी तोडण्यात आलेली सीमाभिंत तातडीने पुन्हा बांधण्यात यावी,अशी सूचना देण्यात आली आहे.
- सतीश वाघमारे, कार्यकारी अभियंता स्थापत्य, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय
PMG25B02790