पुणे, ता. १४ : ‘‘वीस वर्षांपूर्वी आत्महत्या प्रतिबंधासाठी काम सुरू केले. तेव्हा हा विषय निषिद्ध मानला जात होता. मात्र, आज आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्याच्या या अभियानात तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. एकांत, शांतताही मनाला खात असते. त्यामुळे संवाद वाढविणे, एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. नैराश्य, दडपण, मानसिक कोंडी होत असल्यास मन मोकळे करायला हवे. मनावर ओझे घेऊन जीवन जगत राहिलो तर वाईट विचार प्रबळ होतात आणि टोकाचे विचार येऊ लागतात,’’ असे मत कनेक्टिंग ट्रस्टच्या संस्थापिका अर्णवाज दमानिया यांनी व्यक्त केले.
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त ‘मानसिक आरोग्य’ याविषयी जनजागृतीसाठी मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. आत्महत्या प्रतिबंधासाठी गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्या पुढाकारातून संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता ते आपटे रस्ता असा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर, समन्वयक गायत्री दामले, वीरेन राजपूत, रोटेरियन सुमेधा भोसले, रोटरी क्लब सारसबागचे आशुतोष वैद्य, रोटरी क्लब ऑफ पुणे साउथच्या अध्यक्षा मनीषा बेळगावकर, रोटरी क्लब ऑफ पुणेचे अध्यक्ष जीवराज चोले, रोटरॅक्टचे समन्वयक सुमीत गीते आदी उपस्थित होते. श्रेयस बँक्वेट येथे आत्महत्या प्रतिबंध जागृती करणाऱ्या नाट्यछटांचे सादरीकरण झाले. जीवनातील अंधकार दूर करून आरोग्यदायी आयुष्य जगण्याची प्रेरणा देणारा हा मोर्चा होता. यावेळी सुमेधा भोसले, अल्पना वैद्य यांनीही मनोगते व्यक्त केली. गायत्री दामले यांनी सूत्रसंचालन केले. मार्चमध्ये सहभागी स्वयंसेवकांनी हातामध्ये जनजागृतीपर फलक घेतले होते.