पिंपरी, ता. १४ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) आता बारामती तालुक्याचाही समावेश होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी शासन आणि प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या बाबत प्रस्ताव देण्याबाबत राज्य शासनाने पत्र दिले होते. त्यानुसार ‘पीएमआरडीए’ने दोन सप्टेंबर रोजी प्रस्ताव पाठविला आहे.
बारामती शहर आणि तालुक्यातही नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे त्या भागातील रस्ते व इतर सुनियोजित विकासासाठी स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता आहे. त्यासाठी बारामती तालुक्याचा ‘पीएमआरडीए’मध्ये समावेश करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर शासनाच्या सूचना आल्यानंतर प्रशासनाने प्रस्ताव पाठवला आहे. हा समावेश झाल्यास बारामती तालुक्यात रस्त्यांचे जाळे, सुनियोजित नागरिकरणास मदत होईल. ‘पीएमआरडीए’ला विविध परवानग्या आणि इतर माध्यमातून उत्पन्न मिळेल. समावेश करायचा किंवा कसे याबाबत शासनस्तरावरून निर्णय होईल, असे प्रशासन सांगत आहे.
‘पीएमआरडीए’ हद्दीत पुणे आणि पिंपरी चिंचवड ही शहरे, मावळ, मुळशी आणि हवेली हे तालुके तसेच, भोर, दौंड, शिरूर, खेड, पुरंदर आणि वेल्हे या तालुक्यांतील निवडक भागांचा समावेश आहे. या अंतर्गत दोन महापालिका, तीन कॅन्टोन्मेंट बोर्ड, सात नगरपालिका-परिषद, दोन नगरपंचायतीचा समावेश होत आहे. या भागातील रस्ते, तसेच सुनियोजित नागरीकरणासह विविध विकासकामे ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून केली जात आहेत. त्यामध्ये आता बारामती तालुक्याचीही भर पडेल, अशी चर्चा आहे.
बारामती तालुक्याचा ‘पीएमआरडीए’मध्ये समावेश करावा, यासाठी शासनाकडून ‘पीएमआरडीए’ प्रशासनाला प्रस्ताव पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.
- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए.