Leopard attack : सिन्नरमध्ये बिबट्याचा थरार: नरभक्षक बिबट्याने घेतला आणखी एका चिमुकल्याचा बळी!
esakal September 15, 2025 09:45 AM

सिन्नर/वडांगळी: खडांगळी-निमगाव (देवपूर) शिवारात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाचा बालक ठार झाल्याची भीषण घटना शनिवारी सायंकाळी घडली. मजुरांच्या गर्दीतून बिबट्याने बालकाला हिसकावून जवळच्या उसात नेले. या घटनेने परिसरात भीतीचे सावट आणखी गडद झाले आहे. दरम्यान, गेल्या सात दिवसांत तीन बालकांवर हल्ला होऊन त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

गोलू युवराज शिंगाडे (वय दीड वर्ष) असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. मूळचे कुंबाळे (ता. पेठ) येथील शिंगाडे कुटुंब मजुरीसाठी खडांगळीत आले होते. काम आटोपून शनिवारी (ता. १३) सायंकाळी सातच्या सुमारास अर्जुन कोकाटे यांच्या शेतातील चाळीत मजूर बसलेले असताना, गोलूही आई-वडिलांसोबत होता. या वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत गोलुला उचलून उसाच्या शेतात नेले.

ही घटना घडताच मजुरांमध्ये एकच आरडाओरड झाली. मात्र गडद अंधार व पावसामुळे शोधमोहीम अडथळ्यांतून सुरू राहिली. अखेर निमगाव देवपूर शिवारातील शेतकरी अंबादास मुरडनर यांच्या उसाच्या शेतात गोलूचा मृतदेह आढळला. नरभक्षकाने त्याचा नरडीचा घोट घेतल्याचे स्पष्ट झाले. ही अवस्था पाहताच शेतकरी व मजुरांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.

या घटनेनंतर वन विभागाचे गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. संतोष चव्हाण, गोविंद पंढरी, आकाश रूपवते यांच्यासह शेतकऱ्यांनी टॉर्च व काठ्यांच्या मदतीने परिसर पिंजून काढला. मात्र बिबट्या पसार झाला. मृतदेह विच्छेदनासाठी नाशिकला पाठविण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर गोलूच्या आई-वडिलांचा हंबरडा फोडून आक्रोश झाला.

सात दिवसांत तीन हल्ले, दोन बळी

निमगाव देवपूर शिवारात नरभक्षक बिबट्याने सात दिवसांत तीन हल्ले केले. यात पंचाळे येथील अकरा वर्षांच्या सारंग गणेश थोरात याचा बळी गेला. त्याच दिवशी शिव बोस या शाळकरी मुलाला आजीने बिबट्याच्या तावडीतून बचावले. त्या घटनेनंतर वन विभागाने सुमारे सात ठिकाणी पिंजरे उभारले, मात्र बिबट्या चकवून डांबरनाला परिसरात हिंडत आहे. आता गोलू शिंगोडे या बालकाला उचलून उसात नेऊन ठार केल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ghansawangi Flood: जायकवाडी प्रकल्पातून सुरू झालेला मोठा पाणी विसर्ग; नदीकाठच्या गावांमध्ये जनजीवन विस्कळीत, प्रशासन सतर्क

आज रास्ता रोको

वस्त्यांवर सतत बिबट्याचे हल्ले होत असल्याने वन विभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नरभक्षक बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी खडांगळी येथे रविवारी (ता. १४) सकाळी साडेनऊला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.