पिंपरी : अपुरे पत्ते, चुकीचा मोबाईल क्रमांक, अशा कारणांमुळे शहरातील झोपडपट्टीवासीयांना सेवाशुल्क बिले वेळेत मिळत नव्हती. त्यावर उपाय म्हणून महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत प्रत्येक झोपडीधारकाला सेवाकर बिलाचे वितरण आणि मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलन महापालिकेकडून सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या पाच महिन्यांत ५७ लाख ७९ हजार ६७० रुपये सेवाकर जमा झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत महिलांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ‘सारथी सोनचीरैया’ शहर उपजीविका केंद्राशी संलग्न व महापालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत कार्यरत महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत झोपडपट्टीवासीयांना सेवाकर बिलांचे वितरण आणि मोबाइल ॲपद्वारे मार्च २०२५ पासून माहिती संकलित केली जात आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांकडून सेवाकर भरण्यास प्राधान्य दिले जात आहे.
देयके वेळेत मिळाल्याने गतीमार्च २०२५ मध्ये महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत झोपडपट्टीवासीयांना सेवाकर बिलांचे वितरण सुरू झाले. त्यानंतर वेळेत बिल मिळाल्याने १७ ते ३१ मार्च २०२५ या पंधरा दिवसांत जवळपास १९ लाख तीन हजार ४२९ रुपयांचा सेवाकर वसूल झाला आहे. त्यापूर्वी एप्रिल २०२४ ते १६ मार्च २०२५ पर्यंत म्हणजेच जवळपास अकरा महिने पंधरा दिवसांत २६ लाख ५१ हजार २७८ रुपये वसुली झाली होती. वेळेत बिले मिळाल्यामुळे सेवाकर भरण्यास झोपडपट्टीवासीयांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ‘सारथी सोनचीरैया’ शहर उपजीविका केंद्राशी संलग्न महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत झोपडपट्टीवासीयांना सेवाकर बिलांचे वितरण करण्यात येत आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महसूलवाढीसह महिलांचे सबलीकरण घडत आहे. तसेच सेवाकर वेळेवर भरून झोपडपट्टीवासीयांचे उपक्रमाला चांगले सहकार्य मिळत आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
पिंपरी-चिंचवड महापालिकेने सेवाकर बिलांसाठी राबविलेला उपक्रम एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेने सेवाकर बिल वाटपासाठी राबविलेला पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे झोपडपट्टी क्षेत्रातील सर्वेक्षण, सेवाकर बिलांचे वितरण कामामध्ये महिला बचत गटांचा सहभाग महत्त्वाचा ठरत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमुळे रोजगार निर्मितीबरोबरच नागरिकांमध्ये सेवाकर भरण्याबाबत जागरूकता वाढत आहे.
- अण्णा बोदडे, उपायुक्त, महापालिका
दृष्टिक्षेपात झोपडपट्ट्याएकूण झोपडपट्ट्या - ७१
एकूण झोपड्या (अंदाजे) - २५,०००
सेवा करभरणा (अंदाजे) - १२,०००
निवासी वापर प्रतिझोपडी - ३००
मिश्र वापर (निवास व व्यवसाय) - ६००
व्यावसायिक वापर - ९००