तळेगाव दाभाडे : कामशेतमध्ये वाढती लोकसंख्या आणि कचरा व्यवस्थापनाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पवनानगर रस्ता, सहारा कॉलनी तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिक त्रस्त झाले आहेत.
सध्या पाऊस खूप पडत असल्याने ही समस्या अधिकच भीषण बनली आहे. उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेले काही महिने कामशेतमधील कचरा कुजगाव परिसरात टाकला जात होता, मात्र तेथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे तेथे कचरा टाकणे थांबवावे लागले. ग्रामपंचायतीकडे कचरा टाकण्यासाठी कायमस्वरूपी जागा नाही. त्यामुळे कचरा महामार्गालगत टाकला जातो. नंतर कचरा वडगाव कचरा डेपोत हलविला जातो.
कचरा डेपोसाठी तातडीने पर्यायी जागा निश्चित करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सध्या या परिसरात जागेला बराच भाव मिळतो आहे. त्यामुळे जागा मिळणे अवघड झाले आहे. हे सुद्धा या समस्येचे एक कारण ठरले आहे.
लाखोंचा खर्च होऊनहीकामशेतमध्ये कचरा उचलण्यासाठी दरमहा तीन ट्रॅक्टर, तीन घंटा गाड्या, पाच चालक व १४ सफाई कामगार अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ही वाहने चालविण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लाखो रुपये खर्च होतात. यानंतरही कचरा व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ जात असल्याची नागरिकांची भावना आहे.
सध्या जागा नसल्याने कचरा महामार्गालगत टाकला जातो. तेथून तो वडगाव कचरा डेपोत पाठवला जातो. ग्रामपंचायतीने कचरा डेपो व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले आहेत, पण जागा मिळत नाही.
- धनंजय देशमुख, ग्रामविकास अधिकारी, कामशेत ग्रामपंचायत