ऊसतोड करणाऱ्या युवकाची कार्यकारी अभियंतापदाला गवसणी
esakal September 15, 2025 09:45 AM

खुटबाव, ता.१४ : देलवडी (ता. दौंड) येथील भाऊसाहेब शेलार यांनी शालेय जीवनामध्ये ऊस तोडणी व उसाची लागण करत शिक्षण घेतले. कंदील व दिव्याच्या उजेडावर अभ्यास केला. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत कनिष्ठ अभियंतापद मिळवले. प्रामाणिकपणे काम करत पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यकारी अभियंतापदावर मजल मारली आहे. लवकरच त्यांना अधीक्षक अभियंतापद मिळणार आहे. पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये लोकार्पण केलेली २८५८ घरकुले बांधणे हा प्रकल्प शेलार यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला.

आई वत्सला व वडील श्रीरंग यांनी ऊस तोडणी व मजुरीची कामे करत भाऊसाहेब यांना शिक्षण दिले. त्यांना साथ देण्यासाठी उसाची लागण करणे ऊस तोडणी व मिळेल ती रोजंदारीची कामे त्यांनी केली. प्राथमिक शिक्षण देलवडी येथे झाले. माध्यमिक शिक्षण घरापासून आठ किलोमीटर अंतरावर पायी चालत नाथाची वाडी येथे पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी बारामती येथे राधेश्याम अग्रवाल कॉलेजला सायन्स टेक्निकल महाविद्यालय प्रवेश घेतला. त्यानंतर शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगाव येथे सिव्हिल डिप्लोमा पूर्ण केला. पहिली खासगी नोकरी करताना सर्वात लहान असूनही नर्मदा सरोवर धरणाच्या कालवा डिझाईनचे काम पूर्ण करून घेताना २० अभियंत्यांच्या पथाचे नेतृत्व केले. हे करताना पुणे महानगरपालिकेमध्ये अभियंतापदाची जाहिरात सुटली व चांगले गुण असल्याने नोकरी मिळाली. नोकरीमध्ये १४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पदोन्नतीसाठी वयाच्या चाळीशीमध्ये पत्नी चारुशीला यांच्या आग्रहाखातर अभियंता पदवीचे शिक्षण घेतले.

पुणे महापालिकेत भवन, पथविभाग, भूसंपादन, पाणीपुरवठा या विभागामध्ये अनेक महत्वकांक्षी उपक्रम राबवले. हे करताना सामाजिक काम म्हणून देलवडी गावातील १२०० झाडांचे आईचे बन उभारणे, जय मल्हार व ग्रंथालय व वाचनालयाची उभारणी, जय मल्हार व्याख्यानमाला आदी सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले. दरवर्षी होणाऱ्या पंढरपुर वारीमध्ये संतराज महाराज देवस्थान साठी शेलार परिवाराच्या वतीने वाहतुकीसाठी मोफत ट्रक दिला जातो.


अभियंत्याचे घर व अभियंत्याचे गाव
भाऊसाहेब शेलार यांच्या कुटुंबामध्ये १५ अभियंते आहेत. विशेष म्हणजे ३५०० लोकसंख्या असणाऱ्या देलवडी गावामध्ये १८९ अभियंते आहेत. यापैकी अनेक अभियंत्यांनी आपले कर्तृत्व सातासमुद्रापार नेले आहे. याचे सर्वस्वी श्रेय शेलार व जुन्याजाणत्या अभियंत्यांना जाते.

पुणे महानगरपालिकेत काम करताना अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज उभारणे, चतुःशृंगी, गणेश खिंड व पाषाण परिसरात पिण्याचे पाणी नियमित करणे. भूसंपादन करत रस्ते मोकळे करणे, पुण्यातील २७७ उद्यानांची देखभाल करणे,२८५८ गरीब कुटुंबांना घर मिळवून देणे, अनधिकृत बांधकाम पाडणे ही कामे केली. हे करताना प्रामाणिकपणा, सुसूत्रता, चिकाटी, निर्भीडपणे जोपासला. या यशामध्ये कुटुंबीय व देलवडीकरांचे योगदान आहे. सर्वांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा!
- भाऊसाहेब शेलार, कार्यकारी अभियंता


02894

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.